विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. शनिवारी (२३ नोव्हेंबर) होणार्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दलित समाजाचा अपमान केल्याचा आरोप शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान राजकीय पक्षांकडून अपक्ष आणि इतर लहान पक्षांशी संपर्क साधण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचा पाठिंबा सरकार बनवू शकतो त्याला असेल असे जाहीर केले आहे. सत्ता स्थापनेच्या चर्चांदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये ते म्हणाले, “जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ. आम्ही सत्ता निवडू! आम्ही सत्तेत राहायला निवडू!”. दरम्यान प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी भाष्य केलं होतं. जर प्रकाश आंबेडकर यांचे ५० ते ६० आमदार निवडून आले तर त्यांच्याबरोबर युतीचा विचार करू अशी खोचक टिप्पणी राऊतांनी केली होती. मात्र हे वक्तव्य करून राऊतांनी दलित समाजाचा अपमान केल्याचा आरोप शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने केला आहे.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रकाश आंबेडकरांच्या भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर यांची भूमिका चांगली आहे. सत्तेमध्ये राहून पक्षाचा विस्तार करता येतो. ज्या मतदारसंघात आपण आश्वासने दिली, पण उमेदवार निवडून आले नाहीत तेथे देखील काम करता येते. म्हणून प्रकाश आंबेडकरांनी चांगली भूमिका घेतली आहे आणि तिचे आम्ही स्वागत करतो”. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, “संजय राऊत यांचे हे टोमणे हा त्यांचा(प्रकाश आंबेडकर) अपमान आहे. एखाद्या नेत्याचा असा अपमान करणे गैर आहे. एकेकाळी त्यांचे पाय चेपायला हेच लोकं गेले होते. बाबासाहेबांच्या नातूचा अपमान हा संपूर्ण दलित समाजाचा अपमान आहे असे मी मानतो”.