पर्थच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचं लोटांगण; ऑस्ट्रेलियाचा शिस्तबद्ध मारा

Spread the love

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्याच सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ पहिल्या दिवशी सर्वबाद झाला आहे. पर्थ कसोटीतील पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारतीय संघ १५० धावा करत ऑलआऊट झाला. पहिल्या सत्रात भारताने ४ विकेट्स गमावले तर दुसऱ्या सत्रात ९९ धावा करत ६ विकेट्स गमावले. भारतीय संघाकडून ऋषभ पंत आणि पदार्पण केलेल्या नितीश रेड्डीला चांगली खेळी करता आली. या दोन्ही फलंदाजांनी चांगली भागीदारी रचत भारताला १५० धावांचा टप्पा गाठण्यात मोठी भूमिका बजावली. याशिवाय भारताचे इतर सर्व फलंदाज फेल ठरले. पदार्पणवीर नितीश रेड्डीने सर्वाधिक ४१ धावा केल्या, तर जोश हेझलवूडने सर्वाधिक ४ विकेट घेतले. पहिली दोन्ही सत्रे ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नाही. केएल राहुलने सुरूवातील चांगली बचावात्मक फलंदाजी केली. पण त्याला दुसऱ्या टोकावरून चांगली साथ मिळाली नाही. भारतीय डावाची सलामी देण्यासाठी आलेला यशस्वी जैस्वाल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर देवदत्त पड्डिकललाही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना खाते उघडता आले नाही. जोश हेझलवूडने विराट कोहलीला ५ धावांवर बाद करून भारताला तिसरा धक्का दिला. लंच ब्रेक होण्यापूर्वी केएल राहुल स्टार्कच्या गोलंदाजीवर २६ धावांवर वादग्रस्तरित्या बाद ठरला. राहुलच्या विकेटवरून मोठा गोंधळ सुरू आहे. लंच ब्रेकनंतर मिचेल मार्शने ध्रुव जुरेल (११) आणि वॉशिंग्टन सुंदर (४) यांना आपल्या गोलंदाजीवर बाद केले. ३७ धावा करत ऑस्ट्रेलियावर दबाव टाकणाऱ्या ऋषभ पंतला कमिन्सने बाद करत संघासाठी मौल्यवान विकेट मिळवली. यानंतर हर्षित राणा ७ धावा करून बाद झाला तर कर्णधार जसप्रीत बुमराह ८ धावा करून बाद झाला. भारताला शेवटचा धक्का नितीश रेड्डीच्या रूपाने बसला. नितीश रेड्डीने ५९ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ४१ धावा केल्या. नितीश रेड्डीकडून अधिक धावांची संघाला अपेक्षा होती पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. जोश हेझलवूडशिवाय पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श यांनी २-२ विकेट घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *