‘साथी’, ‘अफलातून’, ‘गंमत जंमत’, ‘घर जमाई’, ‘तिरंगा’, ‘परदेसी’, ‘हनिमून’, ‘घर आया मेरा परदेसी’, ‘भुताचा भाऊ’, ‘शेजारी शेजारी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘माल मसाला’, ‘ऐकावं ते नवलच’ अशा अनेक चित्रपटांतून काम करीत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. त्यांनी १०० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले आहे. त्याबरोबरच त्यांनी मालिकांत साकारलेल्या भूमिकांनादेखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. वर्षा उसगांवकरांनी महाभारत या मालिकेत साकारलेल्या उत्तरा या पात्राचे मोठे कौतुक झाले होते. नुकत्याच त्या बिग बॉस मराठी ५ मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे काही दिवसांपासून त्या सतत चर्चांचा भाग झाल्याचे पाहायला मिळाले.
वर्षा उसगांवकरांनी सांगितली आठवण…
नुकतीच वर्षा उसगांवकरांनी ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बिग बॉस मराठी ५ च्या घरातील एक सदस्य म्हणून प्रवास कसा होता. घरातील इतर स्पर्धक, त्यांचा खेळ, स्वभाव अशा अनेक गोष्टींबद्दल वर्षा उसगांवकरांनी वक्तव्य करीत त्यांचे मत मांडले आहे. त्याबरोबरच त्यांना काही गाण्याचे स्क्रीनशॉट्स दाखवण्यात आले. त्या गाण्याची आठवण त्यांना सांगायची होती. त्यांना जेव्हा ‘बोंबाबोंब’ चित्रपटातील स्क्रीनशॉट दाखवण्यात आला, तेव्हा त्या चित्रपटातीला गाण्याची आठवण सांगताना वर्षा उसगांवकरांनी म्हटले, “सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातील ‘ना सांगताच आज हे कळे मला’ हे अशोक आणि माझं चर्चित गाणं आहे. हे सुपर डुपर हिट गाणं आहे. या गाण्यात अशोक थोडासा ताठ वाटतो. याचं कारण म्हणजे तो एका खूप गंभीर अपघातातून बाहेर आला होता. तो एक चमत्कार होता. त्यानंतर ‘ना सांगताच आज हे कळे मला’ हे अशोकनं केलेलं पहिलं गाणं”, अशी आठवण त्यांनी सांगितली आहे. त्याबरोबरच ‘चोरीचा मामला’ या गाण्याची आठवण सांगताना त्यांनी म्हटले, “सचिन पिळगांवकरनं स्वत: नृत्यदिग्दर्शन केलं आहे. मला जर रिहर्सल जमली नाही, तर तो म्हणायचा की, कर कर तालीम कर. चार, पाच, सहा हजार वेळा कर. तो मजा करायचा.” दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये वर्षा उसगांवकर कोणत्याही गटात सामील न होता, स्वतंत्रपणे खेळताना दिसल्या. त्यांच्या खेळाचे प्रेक्षकांकडून मोठे कौतुकही झालेले दिसले. बिग बॉसमध्ये सहभागी होण्याआधी वर्षा उसगांवकर या सुख म्हणजे नक्की काय असतं, या मालिकेत दिसल्या होत्या. या मालिकेत त्यांनी माई ही भूमिका साकारली होती. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.