महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापू लागल्याचं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून शेवटच्या काही दिवसांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी मतदारसंघांमध्ये प्रचारसभांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चर्चेत आला आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी मोठी मदत केल्याचं श्रेय घेतलं जात असताना दुसरीकडे विरोधकांकडून त्यावरून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. आज सकाळी शरद पवारांनी या योजनेवरून सरकारवर टीका केली असताना आदित्य ठाकरेंनीही योजनेवर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
लोकसत्ताच्या लोकसंवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरेंची सविस्तर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांवर आदित्य ठाकरेंनी सविस्तर उत्तरं दिली. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत विचारणा केली असता त्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. “आम्ही योजनेला विरोध केला नव्हता. पण आम्ही सांगितलं होतं वाढीव निधी द्या. यांना बहिणी कधी दिसायला लागल्या? जेव्हा हे दिसायला लागलं की हे महाराष्ट्रात बेकार हारणार आहेत. दुसरं म्हणजे १५०० रुपये हे देत आहेत. त्यात काही भागणार आहे का? आता सांगतायत आम्ही २१०० रुपये देऊ. मग आधीच २१०० रुपये का दिले नाहीत? तुम्ही एकीकडे अदाणीला ५० हजार कोटींची सूट देऊ शकता, तुम्ही कंत्राटदारांना वाढीव पैसे देऊ शकता, मग लाडक्या बहिणींना जास्त पैसे देऊ शकत नाही?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी महायुतीला केला आहे.