पालघर : विक्रमगड विधानसभेतील शिवसेना बंडखोरीमुळे पालघरमधील महायुतीत वादाची ठिणगी

Spread the love

बोईसर : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभा मतदारसंघामधून शिवसेना (शिंदे) पक्षाकडून झालेली बंडखोरी मोडीत करण्यात शिंदे यांना अपयश आलं असून यामुळे आता पालघर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. प्रकाश निकम यांच्याविरुद्ध कारवाई न केल्यास भाजपा कार्यकर्ते पालघर व बोईसर विधानसभा क्षेत्रात शिवसेना उमेदवाराच्या दरम्यान अलिप्त राहण्याचे संकेत भाजपाच्या जिल्हाध्यक्ष यांनी दिले आहेत. पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी बंडखोरी करत विक्रमगड येथे भाजप उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. प्रकाश निकम यांच्यासोबत प्रचारात अनेक शिवसेना (शिंदे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहत असल्याने प्रकाश निकम यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालघरचे भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी केली आहे. प्रकाश निकम यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महायुतीच्या वतीने देण्यात आल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी बंडखोरी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश निकम यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी तसेच त्यांच्यासोबत प्रचारात सक्रिय असणाऱ्या सहकाऱ्यांना समज देऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भरत राजपूत यांनी केली आहे. या मागणीचा शिवसेनेने विचार न केल्यास भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे बोईसर आणि पालघर या शिवसेनेच्या वाटेला गेलेल्या विधानसभेच्या जागेसाठी काम करणार नाही, असा इशाराच यावेळी भरत राजपूत यांनी दिला. प्रकाश निकम यांच्या उमेदवारीमुळे विक्रमगडमधील भाजपाची जागा धोक्यात आली असून विक्रमगडचा बदला पालघर व बोईसरमध्ये घेण्यासाठी स्थानिक भाजपा संघटनेने दंड थोपटले आहेत. दरम्यान याबाबत प्रकाश निकम यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याबरोबर शिवसेना (शिंदे) पक्षाचा कोणताही कार्यकर्ता प्रचारात कार्यरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *