मतदानाआधी ध्रुव राठीचं महाराष्ट्रातील नेत्यांना खुलं आव्हान, आदित्य ठाकरे तयार; म्हणाले, “हे पण…”

Spread the love

युट्युबर ध्रुव राठी याने महाराष्ट्रातील नेत्यांना एक खुलं आव्हान दिलं आहे. ‘मिशन स्वराज’ नावाने त्याने एक व्हिडिओ सर्व समाजमाध्यमांवर जारी केला आहे. याद्वारे त्याने महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना एक आव्हान दिलं आहे. जो कोणी हे आव्हान स्वीकारेल आणि पूर्ण करून दाखवेल, त्याच्यासाठी मी काम करेन. मात्र, जर हे आव्हान स्वीकारलं आणि पूर्ण करून दाखवलं नाही तर त्याची माझ्यासह माझ्या २.५ कोटी सहकाऱ्यांशी (फॉलोवर्स, सब्स्क्रायबर्स) गाठ आहे. ध्रुव राठीने आव्हान केल्यानंतर महाराष्ट्रातील एक नेता पुढे सरसावला आहे. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे. महाविकास आघाडी म्हणून मी हे आव्हान स्वीकारतो आहे. सत्तेत आल्यावर आम्ही हे पूर्ण करून दाखवू, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ध्रुव राठीने ‘मिशन स्वराज’अंतर्गत राज्यातील नेत्यांपुढे आठ आव्हानं ठेवली आहेत. त्याने म्हटलं आहे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी या आठ महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, माती परीक्षण प्रयोगशाळा (सॉईल टेस्टिंग लॅब) उभारणे, बियाण्यांची बँक उभी करणे, शेतकऱ्यांसाठी ठिकठिकाणी बाजार उपलब्ध करून देणे. दुसरं आव्हान म्हणजे, राज्यभर रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे, तसेच राज्यातील सर्व मुलांना मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, मोफत उत्तम आरोग्य व्यवस्था उभी करणे, राज्यात स्वच्छता राहील, नागरिकांना शुद्ध हवा मिळेल याची काळजी घेणे, गुन्हेगारीपासून मुक्ती मिळवून देणे, राज्यातील जनतेसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, स्थानिक उद्योगांना पुढे येण्यास मदत करणे, सर्वांना रोजगार मिळवून देणे, ही आव्हानं पूर्ण करावी लागतील. ध्रुव राठीने म्हटलं आहे की युट्यूबवर आपलं अडीच कोटी लोकांचं कुटुंब आहे. आपण सरांनी ठरवलं तर सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करायला लावू शकतो. मात्र, त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल. विकासाच्या मुद्द्यांवर मत द्यावं लागेल. त्यामुळे माझं महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना आव्हान आहे की जो कोणी ‘मिशन स्वराज’ पूर्ण करण्याचं वचन देईल त्या नेत्याचा आम्ही आमच्या परीने प्रचार करू. आम्ही अडीच कोटी लोक मिळून त्याला पाठिंबा देऊ. आमची ही खुली ऑफर आहे आणि महाराष्ट्रातील सर्व नेत्यांसाठी उपलब्ध आहे. ज्या नेत्यांमध्ये हिम्मत असेल त्याने ही आव्हान स्वीकारावं आणि ऑफरचा फायदा घ्यावा. मात्र आमची एक अट देखील आहे. जर तुमचा पक्ष निवडणुकीत जिंकला तर ही सर्व आव्हानं तुम्हाला पूर्ण करावी लागतील. तुम्ही जर ती पूर्ण केली नाहीत तर आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी हिशेब मागू. ती आव्हानं पूर्ण करताना त्याची अंमलबजावणी करताना माझ्याकडून होईल ती सर्व मदत करायला मी तयार आहे.

आदित्य ठाकरेंनी आव्हान स्वीकारलं

दरम्यान, ध्रुव राठीचं हे आव्हान आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं असून त्यांनी म्हटलं आहे की ध्रुवने जी आव्हानं दिली आहेत त्याच गोष्टी आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याद्वारे जनतेसमोर मांडल्या आहेत. चला महाराष्ट्र घडवूया, हे पण करून दाखवूया! आव्हान स्वीकारलं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *