नागपूर : महाविकास आघाडीत बंडखोरी, महाविकास आघाडीत मतभेद, मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच आणि बरेच काही, अशा अनेक चर्चा विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा प्रमुख स्पर्धक असलेल्या महाविकास आघाडीबाबत हल्ली जोरात सुरू आहेत. मात्र अशाच प्रकारची कुजबूज महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भारतीय जनता पक्षाच्या संदर्भातही सुरू आहे. मात्र त्यांची वाच्यता दब्यक्या आवाजात होत असल्याने त्याला अद्याप जाहीर चर्चेचे रुप आले नाही. तो मुद्दा आहे. निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना विदभार्तील दोन प्रमुख नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांची आतापर्यंत एकत्र सभा न होण्याचा. निवडणूक अर्ज दाखल करताना हे दोघे नेते एकत्र होते. त्यानंतर अद्याप या नेत्यांच्या एकत्रित सभा नागपुरात किंवा विदर्भात विधानसभेसाठी झाली नाही. विदर्भात भाजपचे चार प्रमुख नेते आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा त्यात समावेश होतो. यापैकी गडकरी, फडणवीस आणि बावनकुळे हे तिघे नागपूरमध्येच राहतात. बावनकुळे आणि फडणवीस हे विधानसभा निवणूक लढवत आहेत. गडकरी आणि खुद्द फडणवीस यांच्याकडे संपूर्ण राज्याच्या प्रचाराची जबाबदारी आहे.त्यांचा पक्षाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रचार सुरू आहे. फडणवीस यांच्या त्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात सभा झाल्या. प्रचार फेरीही झाली. त्यांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा सध्या सुरू आहेत. खुद्द केंद्रीय मत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फडणवीस यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यांच्या प्रचार सभाही झाल्या या सभांना फडणवीस उपस्थित नव्हते. या दोन्ही नेत्यांची एकही संयुक्तिक सभा अद्याप ना दक्षिण-पश्चिम या फडणवीस यांच्या मतदारसंघात झाली ना जिल्ह्यात व विदर्भात. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी वरील दोन्ही नेते एकाच दिवशी नागपुरात होते. पण त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा होत्या. एकत्र सभा कुठेही नव्हती. फडणवीस त्यांच्या भाषणात गडकरी यांच्या विकास कामांचे तोंडभरून कौतूक करतात. गडकरीही नागपुरातील विकास कामांचे श्रेय फडणवीस यांना देतात. यापूर्वी अनेक सरकारी आणि सार्वजनिक कार्यक्रमात हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले आहेत. पण विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांची नागपुरातील एकाही मतदारसंघात अद्याप एकही संयुक्त सभा झाली नाही. त्याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीला गडकरी यांनी अर्ज दाखल केला तेव्हा फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. फडणवीस यांनी अर्ज दाखल केला. तेव्हा गडकरी आणि अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. त्यानंतर या दोन नेत्यांच्या एकत्रित सभा झाल्या नाहीत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.