तिलक वर्माचे पहिले टी-२० आंतरराष्ट्रीय शतक आणि भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये इतिहास घडवला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या युवा फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केली. सलामीवीर युवा फलंदाज अभिषेक शर्माची बॅट पुन्हा एकदा तळपली आणि २५ चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले. तर तिलक वर्माने नाबाद १०७ धावांची शानदार खेळी केली. या दोन्ही खेळाडूंच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने आफ्रिकेला २२० धावांचे आव्हान दिले. भारतासाठी तिसऱ्या टी-२० सामन्याची सुरुवात खूपच खराब झाली. संजू सॅमसन सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली. तिलकने ५६ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह १०७ धावा केल्या. अभिषेकने ५० धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्याने १८ आणि रमणदीप सिंगने १५ धावा केल्या. तिलक वर्माच्या या सामन्यातील शतकासह भारतीय संघ एका खास यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
भारतीय संघाने घडवला इतिहास
भारतीय संघाकडून या वर्षात २०२४ मधील टी-२० क्रिकेटमध्ये हे पाचवे शतक ठरले. २०२४ मध्ये कोणत्याही संघातील खेळाडूंना टी-२० क्रिकेटमध्ये भारतापेक्षा जास्त शतकं झळकावता आलेली नाहीत. जाफना किंग्सने २०२४ मध्ये आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये चार शतकं झळकावली होती. आता टीम इंडियाने त्यांना मागे टाकत पहिले स्थान मिळवून इतिहास लिहिला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे संघ
भारत- ५ शतकं
जाफना किंग्स- ४ शतकं
राजस्थान रॉयल्स- ३ शतकं
ऑस्ट्रेलिया- २ शतकं
कोमिला विक्ट्रोयंस- २ शतकं
संजू सॅमसनने २०२४ मध्ये भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याच्याशिवाय रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी एक शतक झळकावले आहे. या खेळाडूंमुळेच भारतीय संघाने हा खास विक्रम आपल्या नावे केला आहे.
भारतीय संघाकडून २०२४ मध्ये केलेली पाच शतकं:
संजू सॅमसन- २ शतकं
अभिषेक शर्मा- १ शतक
रोहित शर्मा- १ शतक
तिलक वर्मा- एक शतक