२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनसीपी भाजपाच्या सरकार स्थापनेसाठी झालेल्या बैठकीत गौतम अदाणी हजर होते, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवारांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्याच्या गादीवर कोण बसणार हे आता उद्योगपती ठरवणार का? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीका होऊ लागल्याने त्यांनी आता घुमजाव केलं आहे. माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. “एनसीपी आणि भाजपाच्या युतीसाठी पाच बैठका झाल्या होत्या. मी पुन्हा सांगतो अमित शाह, गौतम अदाणी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार या बैठकीला होते. या बैठकीत भाजपात जाण्यासाठी चर्चा झाली होती. सर्व ठरलं होतं. परंतु, त्या घटनेची जबाबादारी माझ्यावर आली आहे. ती जबाबदारी घेतली आहे. बाकी सर्वांना मी सुरक्षित केलं आहे.”
अजित पवारांचं घुमजाव काय?
अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्यावरून राज्यात गदारोळ झाला. त्यामुळे माध्यमांनी आज पुन्हा अजित पवारांना घेरलं. २०१९ च्या बैठकीत गौतम अदाणी होते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी ‘नव्हते’ असं एका शब्दांत उत्तर दिलं. त्यामुळे अजित पवारांनी २४ तासांच्या आत घुमजाव केलं आहे. दरम्यान, अजित पवार ज्या बैठकीबाबत बोलत आहेत, ती बैठक २०१७ ला झाली होती, असं भाजपाच्या सुत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. त्यामुळे ही बैठक नेमकी केव्हा झाली? या बैठकीत गौतम अदाणी खरंच होते का? या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली? हे प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंनीही आज प्रतिक्रिया दिली होती. “मी ऑन कॅमेरा सांगतेय, अशी कोणतीही मीटिंग झाली याची माहिती मला नाही. ही मीटिंग झाली की नाही हेही मला माहीत नाही. सकाळच्या शपथविधीबद्दल मला काहीही माहित नाही. मी झोपले होते आणि सदानंद सुळेंनी उठवंल नी सांगितलं की बघा काय चाललंय.” “आमची चर्चा झाली असती तर आमचे सरकार आलेले तुम्हाला पाहायला मिळाले असते. पण यातली एकही गोष्ट सत्यात उतरलेली दिसली नाही. त्यामुळे अशा प्रश्नांनाही काही अर्थ नाही. ही गोष्ट खरी आहे की, निवडणुका आणि तो कालावधी सोडल्यानंतर केंद्रातले मंत्री आणि उद्योगपती भेटत नाहीत, असे मी म्हणालेलो नाही. ही गोष्टही खरी आहे की, अनेकवेळेला अजित पवार यांना घेऊन मी अदाणींची भेट घेतलेली आहे. त्यांना (अजित पवार) माहिती मिळावी हा त्यामागचा हेतू होता”, असं शरद पवार साम मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.