बॉर्डर गावसकर ट्रॉफीपूर्वी गौतम गंभीर आणि रिकी पॉन्टिंग या दिग्गजांमध्ये वक्तव्यांवर उत्तर प्रत्युत्तर सुरू आहे. रिकी पॉन्टिंगने न्यूझीलंडविरूद्धच्या भारताच्या कसोटी पराभवानंतर विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली होती. यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषेत रिकी पॉन्टिंगला चांगलंच सुनावलं होतं. यावर आता पॉन्टिंगची प्रतिक्रिया समोर आली आहे. रिकी पॉन्टिंग विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल म्हणाला होता की, “मी नुकतीच विराटची आकडेवारी पाहिली, त्यात असे दिसले आहे की गेल्या पाच वर्षांत त्याने फक्त दोन ते तीन कसोटी शतके झळकावली आहेत. ते मला योग्य वाटलं नाही. पण जर ते खरे असेल, तर ही चिंतेची बाब आहे. पाच वर्षांत केवळ दोन कसोटी सामन्यात शतकं झळकावणारा टॉप ऑर्डरमधील फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा कदाचित दुसरा कोणी नसेल.” गौतम गंभीरला पॉन्टिंगच्या या वक्तव्याबाबत जेव्हा पत्रकार परिषदेत जेव्हा विचारण्यात आले, तेव्हा गंभीर म्हणाला, “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? मला वाटतं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याला विराट आणि रोहितची चिंता नसावी. ते दोघेही एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेटसाठी त्यांनी खूप काही साध्य केलं आहे आणि भविष्यातही ते कायम साध्य करत राहतील. मला वाटतं, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते अजूनही खूप कठोर परिश्रम करतात.” गंभीरच्या या वक्तव्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारानेही प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलियन चॅनल 7 स्पोर्ट्सशी बोलताना पाँटिंगने गंभीरच्या प्रतिक्रियेवर आपले मत मांडले आणि म्हणाला, “माझ्यावर त्याच्यावर, त्याच्या कामगिरीवर कोणतीही टीका केली नाही. मी म्हणालो की त्याने ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली आहे आणि तो ऑस्ट्रेलियात तो पुन्हा पुनरागमन करेल. जर तुम्ही विराटला विचाराल तर मला खात्री आहे की तो थोडासा चिंतेत असेल कारण त्याला मागील वर्षांप्रमाणे शतकं झळकावता आली नाहीत.” गंभीरच्या प्रतिक्रियेवर पॉन्टिंग म्हणाला की, “प्रतिक्रिया वाचून मला आश्चर्य वाटले, परंतु प्रशिक्षक गौतम गंभीरला मी ओळखतो. तो खूप चिडखोर स्वभावाचा आहे, म्हणून तो जे काही बोलला त्याचे मला आश्चर्य वाटले नाही.” भारत आणि ऑस्ट्रेलिया २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे. ही कसोटी मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या ३-० अशा पराभवामुळे भारतीय क्रिकेटचे मनोधैर्य खचले आहे. भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका कोणत्याही किंमतीवर जिंकावीच लागेल. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला किमान ४ कसोटी सामने जिंकावे लागतील.