अकोला : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भाजप व वंचित आघाडीमध्ये वर्चस्वाची लढाई आहे. मतदारसंघात जातीय राजकारणासह मतविभाजनाचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरेल. राष्ट्रवादी शरद पवार गटाला बंडखोरीसह अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. मूर्तिजापूर मतदारसंघात चुरशीचा सामना होत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मूर्तिजापूर मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. गत १५ वर्षांपासून भाजपचे हरीश पिंपळे मूर्तिजापूरचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, यावेळेस त्यांच्या उमेदवारीवर अनिश्चितीचे सावट होते. पदाधिकाऱ्यांच्या दबावानंतर भाजपने शेवटच्या टप्प्यात त्यांच्या गळात उमेदवारीची माळ टाकली. भाजपने योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभा घेऊन मतदारसंघात वातावरण निर्मिती केली. हरीश पिंपळे यांच्यासमोर वंचितचे डॉ. सुगत वाघमारे यांचे मोठे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत वंचितला अवघ्या एक हजार ९१० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. वंचितने उद्योजक डॉ. सुगत वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मतदारसंघात तयारी केली. विविध कार्यक्रम व उपक्रमांमधून डॉ. वाघमारेंनी मोर्चेबांधणीवर भर दिला. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपसह वंचितचे प्राबल्य आहे. ‘मविआ’मध्ये मूर्तिजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला आहे. निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेले सम्राट डोंगरदिवे यांना पक्षाने संधी दिली. त्यामुळे गेल्या वेळेस राष्ट्रवादीकडून लढत तिसऱ्या क्रमांकाची ४१ हजार १५५ मते घेणारे रवी राठी यांनी बंडखोरी केली. अपक्ष म्हणून ते निवडणूक लढत आहे. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ‘मविआ’ अंतर्गत नाराजी व गटबाजीचे वातावरण असल्याने डोंगरदिवेंच्या अडचणीत वाढ झाली. मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितसाठी प्रतिष्ठेची लढत आहे. विविध समाजाची गठ्ठा मतपेढी कुणाच्या बाजुने झुकते, यावर देखील मूर्तिजापूरमधील राजकीय समीकरण ठरणार आहेत.