ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा होत आहे. दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नाही, ते वेगळे राहतात असं म्हटलं जात आहे. अद्याप अभिषेक, ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबाने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच ऐश्वर्याच्या एका जुन्या मुलाखतीची चर्चा होत आहे. लग्नानंतर ऐश्वर्याची जेव्हा सासरच्या आडनावाने ओळख करून देण्यात आली होती, तेव्हा तिने काय म्हटलं होतं, जाणून घेऊयात. काही महिन्यांपूर्वी राज्यसभा खासदार जया बच्चन यांना उपसभापती हरिवंश यांनी ‘जया अमिताभ बच्चन’ असं संबोधल्याने त्या संतापल्या होत्या. फक्त जया बच्चन असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. पूर्ण नाव घेण्याची गरज नव्हती, असं जया बच्चन म्हणाल्या होत्या. त्यांचा राज्यसभेतील हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र, लग्नानंतर जया यांची सून ऐश्वर्या रायला जेव्हा ऐश्वर्या राय बच्चन असं एका पत्रकाराने म्हटलं होतं तेव्हा तिने काय प्रतिक्रिया दिली होती ते पाहुयात. एका जुन्या मुलाखतीत जेव्हा एका पत्रकाराने तिची बच्चन आडनाव जोडून ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिली, तेव्हा ऐश्वर्या रायने थोडी आश्चर्यचकित करणारी प्रतिक्रिया दिली होती. “ओहो…हे टायटल आहे का. देवा..! फक्त ऐश्वर्या म्हणा, ज्या नावाने तुम्ही मला ओळखता,” असं ती म्हणाली होती. राय बच्चन हे तुझे अधिकृत आडनाव आहे का? असा प्रश्न विचारल्यावर ऐश्वर्या म्हणालेली, “ऐश्वर्या राय.. कारण मी प्रोफेशनली या नावाने ओळखली जाते. मी अभिषेक बच्चनशी लग्न केलं. त्यामुळे साहजिकच ऐश्वर्या बच्चन. तुम्हाला जे नाव घ्यायचं आहे घ्या.”