प्रतिष्ठेच्या आणि बहुचर्चित बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर उस्मान ख्वाजाच्या बरोबरीने सलामीवीर कोण असणार यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीने नॅथन मॅकस्विनीला संधी देण्याचं ठरवलं आहे. ऑस्ट्रेलियाने १३ सदस्यीय संघाचीच घोषणा केली आहे. स्कॉट बोलँड आणि जोश इंगलिस हे राखीव खेळाडू असतील. मार्कस हॅरिस, सॅम कोन्टास यांची नावं सलामीवीराच्या भूमिकेसाठी चर्चेत होती. पण जॉर्ज बेली यांच्या नेतृत्वातील निवडसमितीने मॅकस्विनीच्या नावाला पसंती दिली आहे. भारत अ संघाविरूद्धच्या लढतीत मॅकस्विनीला १४ आणि २५ अशा धावा करता आल्या. मात्र डोमेस्टिक क्रिकेटमधल्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत त्याच्या नावाला प्राधान्य देण्यात आले आहे. २५वर्षीय मॅकस्विनीने ३४ प्रथम श्रेणी सामन्यात ३८.१६च्या सरासरीने २२५२ धावा केल्या आहेत. यामध्ये ६ शतकं आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. गरज पडल्यास तो फिरकी गोलंदाजीही करतो. शिल्ड क्रिकेट स्पर्धेत मी सातत्याने चांगला खेळलो, त्याचं हे फळ आहे. माझ्या खेळात दररोज सुधारणा होते आहे. भारत अ संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव अनेक नव्या गोष्टी शिकवणारा होता. कसोटी क्रिकेटसाठी मी तय्यार आहे असं मॅकस्विनीने म्हटलं आहे. मॅकस्विनीकडे सलामीवीर म्हणून खेळण्याचा अनुभव एका सामन्यापुरता मर्यादित आहे. पण तो या भूमिकेला न्याय देऊ शकेल असं निवडसमिती अध्यक्ष जॉर्ज बेली यांना वाटतं. दरम्यान अष्टपैलू कॅमेरुन ग्रीन दुखापतग्रस्त असल्याने निवडसमितीने सहा फलंदाज, एक यष्टीरक्षक आणि चार गोलंदाज अशा पद्धतीने संघाची रचना केली आहे. वॉर्नरच्या निवृत्तीनंतर सलामीवीर म्हणून खेळलेला अनुभवी स्टीव्हन स्मिथ त्याच्या मूळ जागी अर्थात चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी यांच्यासह मार्नस लबूशेन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श फलंदाजीची धुरा सांभाळतील. अॅलेक्स कॅरे देशातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहे त्यामुळे त्याची निवड होणं स्वाभाविक आहे असं निवडसमितीने म्हटलं आहे. कर्णधार पॅट कमिन्स याच्यासह मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड हे वेगवान गोलंदाजीचं आक्रमण सांभाळतील. गेली अनेक वर्ष हेच त्रिकुट ऑस्ट्रेलियाचा कणा झालं आहे. नॅथन लॉयन संघातला एकमेव फिरकीपटू असेल. राखीव गोलंदाज म्हणून स्कॉट बोलँड संघाबरोबर असेल. पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करणाऱ्या जोश इंगलिसला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान मिळालं आहे. तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध इंगलिसने ऑस्ट्रेलियाचं २५ वनडे आणि २६ टी२० सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे.