आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

Spread the love

सैफ अली खान आणि करीना कपूर या जोडप्याच लग्न होण्यापूर्वी माध्यमांत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये ते लग्न कधी करणार यावर चर्चा होत असे. ‘टशन’ सिनेमापासून करीना आणि सैफ अली खान यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं आणि २०१२ मध्ये बी टाऊनच्या या कपलनं लग्न केलं. मात्र या जोडप्याला आंतरधर्मीय विवाहामुळे अनेक धमक्या मिळाल्या होत्या. सैफ अली खाननं अनेक मुलाखतींद्वारे याबाबत खुलासा केला आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या लग्नाला काहींनी विरोध केला होता. दोघांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या मिळाल्या होत्या. मात्र, त्याचा फारसा विचार न करता, दोघांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये खासगी समारंभात लग्न केलं. सैफनं नंतर याबाबत ‘रेडिफ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, “काही लोक आमच्या लग्नाबाबत खूश नव्हते. माझ्या सासऱ्यांना (रणधीर कपूर) यांना काही निनावी पत्रं आली होती, त्यामधून आमच्या कुटुंबाच्या जीवाला धोका दर्शविणारी, आमच्या घराजवळ बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती.” सैफ याच मुलाखतीत म्हणाला होता की, त्याला याचा फारसा त्रास झाला नाही. कारण- त्याच्या कुटुंबानं याआधीही अशी परिस्थिती पाहिली होती. सैफच्या आई-वडिलांचं (मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर) लग्न झालं तेव्हादेखील त्यांना अशा धमक्या आल्या होत्या. “आमच्याबद्दल कोण काय विचार करतं, याचं मला काहीही वाटत नाही. धमक्या देणं आणि त्या प्रत्यक्षात आणणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वेळीदेखील असंच काहीसं झालं होतं,” असं सैफनं सांगितलं. यापूर्वी ‘मोजो स्टोरी’शी संवाद साधताना शर्मिला टागोर यांनीदेखील त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांना आलेल्या धमक्यांबद्दल वक्तव्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “जेव्हा मी कोलकात्यामध्ये लग्न करीत होते, तेव्हा माझ्या पालकांना टेलीग्रामद्वारे धमक्या मिळत होत्या की, ‘गोळ्या बोलतील.’ असा संदेश लिहीत धमक्या दिल्या जात असत. त्याच वेळी टायगरच्या कुटुंबालाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळत होत्या आणि तेसुद्धा चिंताग्रस्त झाले होते.” मात्र, लग्नानंतर काहीही वाईट घडलं नाही, असं शर्मिला म्हणाल्या. सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नानंतर त्यांना चार वर्षांनी २०१६ मध्ये पहिला मुलगा झाला. त्याचं नाव तैमूर ठेवण्यात आलं. या नावावरूनही सैफ अली खानला ट्रोल करण्यात आलं होत. २०२१ मध्ये सैफ आणि करीनाला जहांगीर हा दुसरा मुलगा झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *