‘ते ठाकरे असतील तर मी राऊत’, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Spread the love

काही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा घाणेरडी केली, अशी टीका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता केली. त्यांच्या टीकेला आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे. विक्रोळी येथे राज ठाकरेंची शुक्रवारी सभा संपन्न झाली. या सभेत बोलत असताना त्यांनी एक संपादक या परिसरात राहत असल्याचे म्हटले. तो रोज सकाळी उठून माध्यमांसमोर बडबड करतो, त्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाची घाण करून टाकली, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. जे राज्याची लूट करत आहेत. त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्या शत्रूला जी भाषा समजते, त्याला त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. शुद्ध तुपातली भाषा कुणासाठी वापराची? महाराष्ट्राच्या शत्रूसाठी? आम्ही चाटूगिरी आणि चमचेगिरी करणारे लोक नाही आहोत. राज ठाकरे काय बोलले, त्यात आम्हाला जायचं नाही. निवडणुका असल्यामुळे ते भाजपाचे स्क्रिप्ट वाचत आहेत. त्यांना स्क्रिप्ट वाचावी लागते. नाहीतर ईडीची वर तलवार आहेच.   संजय राऊत पुढे म्हणाले, “माझं बरचसं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलं आहे. हे राज ठाकरे यानांही माहीत आहे. त्यामुळे कोणत्या वेळेला कोणती भाषा वापरायची, याचे धडे मला राज ठाकरेंकडून घेण्याची आवश्यकता वाटत नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडविलेला राऊत आहे.” “राज ठाकरे ज्या विभागात भाषण करून गेले. तिथे अंडरवर्ल्डचा वापर करून निवडणुका लढविल्या जात आहेत. भाजपा आणि शिंदेंकडून निवडणुकीत गुंडाचा वापर होत आहे. मुंबई-ठाण्यात अनेक गुन्हेगारांवर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. राज ठाकरेंनी त्यावर बोलावं”, असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

विक्रोळी येथे भाषण करताना राज ठाकरे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करून टाकणारा एक भिxx संपादक इथे राहतो. त्यांना वाटतं तोंड त्यांनाच दिलंय. आम्ही ठाकरे आहोत. त्यांना वाटतं शिव्या फक्त त्यांनाच येतात. सर्व राजकारण घाणेरडं करून टाकलंय. कोण काय बोललं, हा प्रश्न नाही. कोण किती खालच्या थराला जाऊन बोलतो, याच्याशी मला काही देणंघेणं नाही. पण माध्यमं जेव्हा हे दाखवतात, तेव्हा उद्या राजकारणात येणाऱ्या पिढीला वाटतं, हेच राजकारण आहे. असा जर समज व्हायला लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लागेल. राजकारण गचाळ होईल, याची कल्पना तरी आहे का? कसलाही मागचा पुढचा विचार न करता सकाळी उठून बडबडत बसण्याचा उद्योग केला जातो.” संयम बाळगतोय तर आम्हाला कमी समजू नये यांनीठ, असा इशारा राज ठाकरे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *