पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू

Spread the love

पाकिस्तानच्या बलुचिस्तान येथे क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि. ९ नोव्हेंबर) भीषण बॉम्बस्फोट झाला असून यात २१ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर ४६ जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. प्राथमिक तपासानुसार ही घटना आत्मघातकी स्पोटाची असल्याचा अंदाज क्वेटाचे पोलीस अधीक्षक मोहम्मद बलोचवस यांनी पीटीआयशी बोलताना व्यक्त केला. बलोच लिबरेशन आर्मी (BLA) यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. क्वेटा रेल्वे स्थानकाच्या तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसण्यासाठी अनेक प्रवाशी प्लॅटफॉर्मवर एकत्र जमले होते, त्यावेळीच हा बॉम्बस्फोट झाला. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. घटनास्थळाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर ते म्हणाले की, इथे शेकडो लोक उपस्थित होते. या स्फोटामुळे प्लॅटफॉर्मच्या छताचेही नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर बचाव कार्य आणि तपास सुरू करण्यात आला आहे. बलुचिस्तान प्रांताचे सरकारी प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले की, आम्ही बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून सामान्य नागरिकांना बाजूला केले आहे. तसेच मृत्यू झालेल्या नागरिकांचे मृतदेह आणि जखमी लोकांना क्वेटाच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. सामान्य माणसांना लक्ष्य करणाऱ्या या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि हल्ल्यामागचे सूत्रधार शोधून त्यांना कठोर शासन करण्याचा शब्द देतो. गेल्या काही काळापासून सामान्य नागरिक, मजूर, महिला आणि मुलांना अतिरेकी लक्ष्य करत आहेत. या हल्ल्यामागे असलेल्यांना सोडले जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *