भारताच्या किरण जॉर्जने कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या (सुपर ३०० दर्जा) उपांत्य फेरीत धडक मारली. किरणने उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित जपानच्या ताकुमा ओबायाशीचा २१-१४, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत ४१व्या स्थानावर असलेल्या २४ वर्षीय किरणने ३४व्या स्थानावरील जपानी प्रतिस्पर्ध्यावर ३९ मिनिटांत मात केली. उपांत्य फेरीत किरणसमोर आता अग्रमानांकित आणि जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या कुन्लावत वितिदसर्नचे आव्हान असेल. वितिदसर्नने चीनच्या लिऊ लियांगला २१-१५, २१-११ असे नमवले. या स्पर्धेत भारताकडून केवळ किरणनेच सहभाग घेतला आहे. उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याच्या पहिल्या गुणाच्या बरोबरीनंतर किरणने पहिल्या गेमला सातत्याने आघाडी राखली. गेमच्या मध्यानंतर काहीसा प्रतिकार करू शकलेल्या ओबायाशीने १५-६ वरून पिछाडी १६-१२ अशी कमी केली. मात्र, त्याला एवढेच समाधान मिळाले. त्यानंतर किरणने १७-१४ अशा स्थितीतून सलग चार गुणांची कमाई करताना पहिला गेम जिंकला. दुसरा गेम चुरशीचा झाला. किरणने सुरुवातीला ७-३ अशी आघाडी मिळवली होती. ओबायाशीने पुढे ८-८ अशी बरोबरी साधली. त्यानंतर प्रत्येक गुणासाठी जोरदार स्पर्धा झाली. गेम १७-१६ अशा स्थितीत असताना किरणने पहिल्या गेमप्रमाणे सलग चार गुणांची कमाई करताना गेमसह विजयावर शिक्कामोर्तब केले.