जयश्री शेळकेंच्या प्रचारार्थ आज बुलढाण्यात उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. या सभेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हाती शोभून दिसतो दरोडेखोरांच्या नाही असं म्हणत महायुतीवर आणि भाजपावर जोरदार टीका केली. तसंच मागच्या वेळी गद्दारांवर विश्वास ठेवला आणि चूक केली त्याबद्दल माफी मागतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले. “तुम्ही सगळ्यांनी मिळून जयश्रीताईंना आमदारकी करा. आपलं बहुमत आल्यानंतर जालिंदरला आमदार करण्याचं काम माझं आहे. अशी माणसं हल्ली सापडत नाहीत. जालिंदरने संपूर्ण तयारी केली होती. त्याने फक्त माझा आदेश ऐकला आणि तो थांबला. त्याची जबाबदारी मी आता घेतली आहे. माझ्याकडे फसवाफसवी नाही. थोतांड नाहीत. मला शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं होतं बाकी सगळ्या गोष्टी जातात आणि परत येतात. ट्रम्पही हरले होते परत निवडून आले. आपण शब्द दिला की काही वाट्टेल ते झालं तरी शब्द पडू द्यायचा नाही. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सगळे मित्रपक्ष आहेत. आपल्या विरोधात सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत.” असं उद्धव ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवरायांचा झेंडा घेऊन नाचवत आहेत ते काही सगळेच मावळे नाहीत. गेल्या वेळी आपण चूक केली. मी निवडणुकीच्या प्रचारात फिरतो आहे तर पाहिलं की प्रत्येक ठिकाणी आपल्या विरोधात आपला गद्दार उभा राहिला आहे. साहजिकच आहे ही चूक माझी आहे कारण यांना तिकिट विश्वास ठेवून मी दिलं होतं. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्या गद्दारांना निवडणून दिलं होतं. आता त्या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे निर्माण केले होते. छत्रपती शिवरायांचा जो भगवा झेंडा आहे तो मावळ्यांच्या हातात शोभतो दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही. आपल्या पक्षावर दरोडा घातला. चाळीस जणांची टोळी आली दरोडा घालून पक्ष चोरुन नेला. आता म्हणत आहेत की हा पक्ष आमचा आहे. गद्दारच आहेत ते, खोकेबाज आणि धोकेबाज आहेत. पन्नास खोके आता नॉट ओके. आता यांनी एवढं कमावलं आहे की त्यांना हरवलं तरी काही फरक पडत नाही एवढं त्यांनी कमावलं आहे. असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ५० खोके तर आता सुट्टे पैसे झाले आहेत त्यांच्यासाठी असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.
चोर दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे चालून येता?
भाजपावाल्यांची आणि मोदींची आम्हाला कमाल वाटते आहे की तुम्ही चोर-दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येत आहात? भाजपाला कुणी ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. हिंदुत्वाचा भ्रम तुम्ही निर्माण केलात. वर गेल्यानंतर आम्हाला लाथा घालू लागलात? ठीक आहे तुमचं तंगडं धरुन तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिलं नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलणार नाही. असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले. बाहेरच्या राज्यातून या लोकांना प्रचारासाठी लोक आणावे लागत आहेत. यांनी काल परवाकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विदर्भात फिरून गेले. एक नारा देऊन गेले की बटेंगे तो कटेंगे. कुणाची हिंमत आहे असं करण्याची? आम्हाला काय शिकवत आहात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसंच माझ्या बरोबर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बारा बलुतेदार सगळे आमच्या पाठिशी आहेत. योगीजी तुमच्या महायुतीकडे बघा. तुमच्या गुलाबी जॅकेटवाले म्हणाले बाहेरच्या लोकांनी येऊन लुडबूड करु नये. महायुतीत एकवाक्यता नसेल तर तुम्ही आम्हाला कशाला शिकवता? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.