मुंबईः ऑनलाईन संकेतस्थळावरून घरातील जुन्या वस्तू विकणे जोगेश्वरीतील महिलेला भलतेच महागात पडले. फर्निचर खरेदीच्या नावाने अज्ञात आरोपीने महिलेचे बँक खाते रिकामे केले. आरोपीने एकूण साडेसहा लाख रुपयांची रक्कम इतर खात्यात हस्तांतरीत केली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याप्रकरणा मागे सराईत आरोपी असण्याची शक्यता वर्तवली आहे. बँक व्यवहारांच्या माध्यमातून ओशिवरा पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. याशिवाय सायबर पोलीसही याप्रकरणात समांतर तपास करत आहेत. तक्रारदार महिला जोगेश्वरी येथील रहिवासी आहे. त्यांच्या घरात जूने लाकडी फर्निचर होते. तक्रारदार यांना ते विकून नवीन फर्निचर खरेदी करायचे होते. त्यामुळे त्यांनी सोमवारी जून्या वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर फर्निचरचे छायाचित्र अपलोड केले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने तो फर्निचर विकत घेणार असल्याचे भासवले. त्याने फर्निचरची किंमत १५ हजार रुपये ठरवली. महिलाही त्या रकमेवर घरातील जुने फर्निचर विकण्यास तयार झाली. त्यानंतर आरोपीने महिलेला ई-वॉलेटवर सुरुवातीला ५०० रुपये पाठवले. खात्यातील रक्कम तपासतो असे सांगून त्याने महिलेला आणखी एक क्यूआर कोड पाठवला. त्या कोडमध्ये पे असे नमूद होते. हा प्रकार महिलेला संशयास्पद वाटल्याने तिने विचारणा केली. तेव्हा ठगाने सुरुवातीला आपल्या खात्यातून पैसे काढले जातील. त्यानंतर, ते पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अशा भूलथापा मारल्या. त्यावर, विश्वास ठेऊन महिलेने १४ हजार ९९५ रुपये ऑनलाईन पाठवले. काही वेळाने महिलेने ठगाला दूरध्वनी करून पैशांबाबत विचारणा केली. ठगाने महिलेला पुन्हा एक क्यू आर कोड पाठवला. त्याने महिलेला वारंवार क्यू आर कोड पाठवून महिलेच्या खात्यातून ६ लाख ४८ हजार रुपये काढले. ठगाने पुन्हा क्यू आर कोड पाठवून महिलेला आणखी १९ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. तेव्हा महिलेने पैसे पाठवण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. महिलेच्या खात्यातून काढण्यात आलेल्या रकमेची माहिती मागवण्यात आली असून त्या व्यवहाराच्या आधारे तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.