“माझे मित्र…”, नरेंद्र मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनकॉलनंतर सोशल पोस्ट; म्हणाले…

Spread the love

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प जिंकून आल्यानंतर जगभरात त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यात काही देशांच्या प्रमुखांनी अभिनंदन केलं असून काही देशांनी अभिनंदनाबरोबरच काहीशी सावध भूमिकाही व्यक्त केली आहे. रशियाकडून ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्ध थांबेल की नाही हे येत्या दिवसांत दिसेलच, अशी प्रतिक्रिया आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख ‘मित्र’ असा करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्याशी फोनवर संवाद साधल्यानंतर मोदींनी सोशल मिडिया एक्सवर यासंदर्भात केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी २९६ मतांनिशी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयावर शिक्कामोर्तब केलं. विजयासाठी २७० मतांची आवश्यकता असताना कमला हॅरिस यांना अवघी २२६ मतं मिळवता आली. त्यामुळे ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला. विजयानंतर केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्याची ही संधी असल्याचं विधान करत स्थलांतरितांच्या मुद्द्यावर कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले.

पंतप्रधान मोदींच्या आधी ‘एक्स’वर शुभेच्छा, नंतर फोन!

दरम्यान, ट्रम्प यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी त्यांना एक्स या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या व त्यानंतर रात्री विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर फोनही केला. दुपारी केलेल्या पोस्टमध्येही मोदींनी ट्रम्प यांचा उल्लेख ‘माझे मित्र’ असा करत दोघांच्या भेटीचे काही जुने फोटो शेअर केले होते. “माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांना या विजयाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. तुमच्या आधीच्या कार्यकाळातील यशाच्या पायावरच नव्या कार्यकाळाची वाटचाल तुम्ही सुरू करत असताना भारत व अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी अधिकाधिक वृद्धिंगत होईल, अशी मी आशा करतो. एकत्र मिळून आपल्या लोकांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करूयात. जागतिक शांतता, स्थैर्य व समृद्धीचा पुरस्कार करुयात”, असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. दरम्यान, संध्याकाळी सर्व राज्यांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची अधिकृ घोषणा करण्यात आली. त्यावेळी मोदींनी ट्रम्प यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी सविस्तर माहिती समोर येऊ शकलेली नसली, तरी मोदींनी रात्र केलेल्या पोस्टमध्ये त्याबाबत सूचक टिप्पणी केली आहे. “माझे मित्र राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अतिशय उत्तम संवाद झाला. त्यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल त्यांचं मी अभिनंदन केलं. तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ व इतर अनेक क्षेत्रांमधील भारत व अमेरिका यांच्यातील संबंध वृद्धिंगत होण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करू, यासाठी मी आशादायी आहे”, असं मोदींनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *