आयपीएल २०२५ महालिलावासाठी ११६५ भारतीय खेळाडूंनी नाव नोंदवलं आहे. तर एकूण १५७४ खेळाडू आयपीएल २०२५ च्या लिलावात उतरणार आहेत. खेळाडूंचा हा महालिलाव येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दा येथे होणार आहे. ११६५ भारतीय खेळाडूंपैकी २३ भारतीय खेळाडूंची मूळ किंमत सर्वाधिक २ कोटी ठेवण्यात आली आहे. ऋषभ पंत, केएल राहुल आणि गतवर्षीचा आयपीएल चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यर हे रिलीज झालेले खेळाडू २ कोटींच्या कॅटगरीमध्ये आहेत. ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, खलील अहमद, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, दीपक चहर, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, इशान किशन, मुकेश कुमार, भुवनेश्वर कुमार, प्रसीद कृष्णा, टी नटराजन, कृणाल पंड्या, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, देवदत्त पडिक्कल आणि मोहम्मद शमी. आयपीएल महालिलाव हा नेमका भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान होणार आहे. २२ नोव्हेंबरला पर्थ येथे या कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. डिस्ने स्टार, ज्यांच्याकडे आयपीएल आणि भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका या दोन्हींचे प्रसारण अधिकार आहेत. कसोटी सामना आणि आयपीएल महालिलाव एकाचवेळी होणार आहे, पण ऑस्ट्रेलियात सामने असल्याने वेळेतील फरकामुळे, लिलाव, भारतीय वेळेनुसार दुपारी आयोजित केल्यास त्याचा चाहत्यांना योग्य लाभ घेता येईल.
७५ लाख मूळ किंमत असलेले खेळाडू
पृथ्वी शॉ आणि सर्फराझ खान यांनी ७५ लाखांच्या मूळ किमतीत नोंदणी केली आहे. शॉला गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सने कायम ठेवले होते. सर्फराझला गेल्या वर्षी लिलावात कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतले नव्हते. मेगा लिलावासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंची लांबलचक यादी बीसीसीआयने अद्याप जाहीर केलेली नाही. आयपीएल फ्रँचायझींकडून इनपुट मिळाल्यानंतर यादी जाहीर केली जाईल. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कला २०२४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने २४.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने महालिलावात २ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत नोंदणी केली आहे. जोफ्रा आर्चर देखील त्याच मूळ किंमतीच्या यादीत आहे, ज्याने २०२३ पासून दुखापतीमुळे आयपीएलमध्ये एकही सामना खेळलेला नाही. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनही आयपीएल लिलावात उतरणार आहे. त्याने २०१४ पासून एकही टी-२० सामना खेळलेला नाही आणि तो यापूर्वीही कधी IPL चा भागही नव्हता. त्याने लिलावासाठी १.२५ कोटी रुपयांच्या मूळ किमतीत नोंदणी केली आहे. अँडरसनने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.