मुंबई- वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी नापसंती व्यक्त करत राजकारणात राजकारण राजकारणासारखे झाले पाहिजे. महिलेवर किंवा कुणावरही व्यक्तिगत पातळीवर अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले आहे.
माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, वसंत देशमुख यांनी केलेले वक्तव्यच चुकीचे आहे. एखाद्या महिलेसंदर्भात अशा प्रकारची भाषा वापरणे हे महाराष्ट्राच्या, मराठी संस्कृतीला शोभा देणारे नाही. याबाबत स्वतः सुजय विखे पाटील यांनीही हे विधान चुकीचे असल्याची भुमिका घेतलीय. हे वक्तव्य गैर असल्याबाबत कुणाचे दुमत नाही. पण त्या आडून कुणीही आपले राजकारण साधू नये.
तसेच सुजय विखे यांच्या संशयाच्या दृष्टीने पोलीसही तपास करून चौकशी करतील. परंतू राजकारण गाड्या जाळणे, हत्या करणे इथपर्यंत टोकाला जाणे हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला योग्य नाही. निवडणुकीवेळी अशा प्रकारे वादंग निर्माण होणे, वितुष्ट टोकाला जाणे हे योग्य नाही. त्याचा समाज मनावर, निवडणुकीवर विपरीत परिणाम होतो. हे कुठेतरी थांबायला हवे, असेही दरेकर म्हणाले.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम येथून निवडणूक लढविणार आहेत. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, लोकशाहीत निवडणुकीच्या राजकारणात येऊन विधिमंडळात जाऊन राजकारण करणे या अमित ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागतच आहे. अमित ठाकरे लवकरच प्रगल्भ अशा प्रकारचे राजकीय नेतृत्व झालेले आहे. त्यांचा भविष्यकाळ निश्चितच उज्वल आहे. राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी निवडणुकीत राजकारण केले नाही. तथापी विकास करायचा असेल, समाजाला दिशा द्यायची असेल तर लोकशाही प्रक्रियेतून निवडणुकीच्या राजकारणातून विधिमंडळात जाणे लोकशाहीसाठी कौतुकास्पद, गौरवास्पद आहे.
भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित ठाकरे यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर बोलताना दरेकर म्हणाले की, महाराष्ट्राचे राजकारण सुसंस्कृत, खेळीमेळीचे आहे. खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांच्या सहकार्यातून लोकशाहीला अभिप्रेत असणाऱ्या सलोख्याने निवडणुका लढविल्या जातात. ज्यावेळी आदित्य ठाकरे उभे होते त्यावेळी राज ठाकरेंनी मोठ्या मनाने एक भुमिका घेतली होती. आता त्यांचे चिरंजीव मैदानात येत असताना आशिष शेलार यांची अशा प्रकारची भुमिका आली तर ते गैर असल्याचे वाटता कामा नये. त्या अर्थाने आशिष शेलार यांचा पुढाकार असेल.