छत्रपती संभाजीनगर : पैठण मतदारसंघातील शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षाचे अधिकृत उमेदवार विलास भुमरे यांनी त्यांच्या शपथपत्रात त्यांच्या पत्नी नावे मद्यविक्रीचे चार परवाने असल्याची माहिती दिली आहे. या पूर्वी लाेकसभा निवडणुकीमध्ये खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांच्या नावावर दोन मद्य परवाने असल्याची माहिती दिली होती. वडील संदीपान भुमरे व त्यांच्या स्नुषा या दोघांच्या नावावर सहा मद्य परवाने असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ‘ मद्य विक्रेता’ असा शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षाने प्रचार करुनही संभाजीनगर मतदारसंघातून संदीपान भुमरे यांना पसंती देत छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांनी खासदार म्हणून निवडून दिले. भुमरे कुटुंबियांच्या नावे नऊ मद्यविक्री परवाने असल्याचा आरोप होत होता. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील वडील व मुलांच्या शपथपत्रातील माहितीमुळे सहा परवाने असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे पुणे येथेही मद्यविक्रीचा परवाना भुमरे कुटूंबियांकडे असल्याचे शपथपत्रात नमूद आहे.
पैठण मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव ठाकरे ) पक्षाच्या उमेवारीचा अंतर्गत तिढा अद्याप सुटलेला नाही. वळदगाव येथे देशी, विदेशी व बिअर मद्यविक्रीचे तीन परवाने असून पुणे येथे मद्यविक्रीचा परवाना आहे. विलास भुमरे यांच्या शपथ पत्रातील माहितीनुसार त्यांची संपत्ती १६ कोटी ८८ लाख ६१ हजार २४६ कोटी रुपयांची संपत्ती असून पत्नींच्या नावे सात कोटी चार लाख १७ हजार १४७ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पेट्रोल पंप, हॉटेल, लॉन्स आदी व्यावसायाबरोबर शेतीतून उत्पन्न स्रोत असल्याचे भुमरे यांनी म्हटले आहे. मद्यविक्रीचे परवाना दर हे लोकसंख्येच्या प्रमाणावर ठरतात. जिथे लोकसंख्या अधिक तेथे परवाना शुल्क अधिक असा नियम असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी सांगातात.