प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना व त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना यांचं नातं काहीसं तणावपूर्ण होतं. ट्विंकलची आई व अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांच्याशी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ट्विंकल व तिची बहीण रिंकी आईबरोबर घराबाहेर पडल्या. पुढील काळात ट्विंकलचं संगोपन प्रामुख्यानं डिंपल यांनी केलं आणि आईच तिच्या जीवनातला आधारस्तंभ बनली. जेव्हा ट्विंकलनं स्वतःची अभिनय कारकीर्द सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिला वडिलांचा पाठिंबा मिळाला. बाप-लेकीमधील नातं अस्थिर असलं तरी ट्विंकल २०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनाच्या वेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होती. राजेश खन्ना यांच्या निधनाच्या काही वर्षांनंतर ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी राजेश खन्नांवर टीका केली तेव्हा ट्विंकलनं वडिलांच्या समर्थनार्थ उभे राहण्याचा निर्णय घेतला. नसिरुद्दीन शाह यांनी २०१६ मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, “१९७० च्या दशकातच हिंदी चित्रपटांत मध्यम दर्जाचं काम सुरू झालं. त्यावेळी राजेश खन्ना यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यांच्या यशाबद्दल काहीच बोलता येणार नाही. मी त्यांना एक मर्यादित अभिनेता मानतो.”
वडिलांच्या समर्थनार्थ ट्विंकलचं उत्तर
या टीकेला उत्तर देताना ट्विंकलनं ट्विटरवर म्हटलं, “जर तुम्हाला जिवंत लोकांचा सन्मान करता येत नसेल, तर निदान मृतांचा तरी करा. जे प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत, त्यांच्यावर अशा प्रकारे टीका करणं म्हणजे तुम्ही खूप खालचा स्तर गाठला आहे.” खरं तर, राजेश खन्ना यांच्यावर शाह यांच्याप्रमाणेच इतरांनीदेखील टीका केली आहे. काहींनी त्यांना अहंकारी आणि असुरक्षित म्हटलं आणि काहींनी त्यांच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढले होते. डिंपल कपाडिया यांनी ट्विंकलच्या संयम आणि परिपक्वतेचं कौतुक केलं होतं. २०१९ मध्ये जयपूर येथे एका कार्यक्रमात त्या म्हणाल्या, “ती एक विलक्षण मुलगी आहे. मी राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाले तेव्हा ती फक्त सात-आठ वर्षांची होती. तिच्यातील परिपक्वता आश्चर्यकारक होती. ती माझी खरी मैत्रीण बनली आणि नंतर तर ती माझी काळजी घेणारी जणू माझी आईच बनली.”