भाईंदर पश्चिमेत अत्याधुनिक क्रीडा संकुलाचे लोकार्पण, खेळाडूंना आधुनिक सुविधांचा लाभ

मिरा-भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील प.पू.ग. जैनाचार्य श्री विजय अभयदेव सूरिश्वरजी म.सा. क्रीडा संकुल व सभागृह इमारतीचे लोकार्पण बुधवारी सकाळी पार पडले. महापौर डिंपल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचे लोकार्पण करण्यात आले. या वास्तूमुळे भाईंदर पश्चिमेतील क्रीडाप्रेमी व खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत आमदार नरेंद्र मेहता यांनी व्यक्त केले.
यावेळी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, कविता बोरकर, प्रणाली घोंगे, शहर अभियंता दीपक खांबित, महिला व बालकल्याण समिती सभापती अनिता पाटील, उपसभापती हेमा बेलानी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरा-भाईंदर शहरात यापूर्वी खेळाडूंसाठी केवळ एकच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उपलब्ध होते. शहरातील क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी २०१८ साली भाईंदर पश्चिम येथे नवीन क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१९ मध्ये प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली आणि अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे क्रीडा संकुल अखेर नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगत अग्निशमन केंद्राच्या जागेत उभारण्यात आलेल्या या चार मजली इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ३४८२.५० चौ.मी. असून सुमारे ४२ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
या क्रीडा संकुलात तळमजल्यावर नॉन एसी सभागृह, पहिल्या मजल्यावर हॉल, दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय, कॅरम, टेबल टेनिस, जिम आणि स्टोअररूम, तिसऱ्या मजल्यावर स्क्वॉश कोर्ट, कबड्डी कोर्ट, तायक्वांदो व बॉक्सिंग कोर्टाची सुविधा देण्यात आली आहे. तर चौथ्या मजल्यावर आधुनिक क्रिकेट टर्फ विकसित करण्यात आले आहे.
तसेच भविष्यात या क्रीडा संकुलात बॅडमिंटन कोर्ट, पिकल बॉल आणि स्विमिंग पूल उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती देण्यात आली. आमदार नरेंद्र मेहता यांच्या संकल्पनेतून आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे क्रीडा संकुल साकार झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, या क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी मागील पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रकल्पाचे भूमिपूजन देखील महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *