मुंबई बँकेच्या बांद्रा शाखा उदघाटनप्रसंगी आ. अनिल परब यांचे प्रतिपादन
मुंबई – आ. प्रवीण दरेकर आणि माझी मैत्री सर्वश्रुत आहे. या बँकेची जबाबदारी शंभर टक्के माझी आहे. बँकेची सुरक्षा, बँकेत येणाऱ्या ग्राहकांचे समाधान याची जबाबदारी येथील मी रहिवाशी असल्याने माझी आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनी मुंबई बँकेच्या बांद्रा (पूर्व) शाखेच्या उदघाटनप्रसंगी केले.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रामकृष्ण परमहंस मार्ग, गांधीनगर बांद्रा (पूर्व) येथील शाखेचा उदघाटन सोहळा आज आ. अनिल परब व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे जेष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, नगरसेवक आणि संचालक प्रकाश दरेकर, संचालक विष्णू घुमरे, आनंदराव गोळे, संतोष दुवाळी, संचालिका शिल्पा सरपोतदार, जयश्री पांचाळ, तेजस्विनी घोसाळकर, कविता देशमुख, राज्य कंझ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम, मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे यांसह बँकेचे कर्मचारी, सहकारातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्घाटन पर भाषणात बोलताना विधानपरिषदेचे आमदार अनिल परब म्हणाले की, माझा अभ्यास नसला तरी सहकाराकडे माझं लक्ष असतं. प्रवीण दरेकर यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या नकाशावर ठळकपणे दिसण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून झाले आहे. आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तरी एकमेव या बाजूचा समर्थक मी प्रवीण दरेकर यांचा आहे. हे विषय सभागृहात कधी आले तर त्यावर प्रभावी भूमिका मांडण्याची जबाबदारी माझ्यावर असते आणि ती मी मनापासून करतो. सहकारातून सर्व हे उभे राहिलेले आहे. प्रवीण दरेकर यांचे योगदान मला माहित आहे. स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीतही त्यांची धडपड मी पाहत आलो आहे. मुख्यमंत्र्यांची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी आहे. मुंबई बँकेच्या माध्यमातून जे विस्ताराचे जाळे वेढलेले आहे ते ग्राहकांच्या समाधानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बॅंकेत येणारा माणूस हा अतिथी आहे आणि त्याचे समाधान होईल याची काळजी आपल्यासोबत मीही घेईन. हजारो कोटींच्या ठेवी या बँकेत येवो आणि त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होवो, अशा शुभेच्छाही आ. परब यांनी दिल्या.
तर मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, या विभागात सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर राहतो. त्यांना सोयीची होईल अशा प्रकारची मुंबई बँकेची शाखा येथे निर्माण होत आहे. मुंबई जिल्हा बँक अतिशय झपाट्याने दिवसेंदिवस वाढत आहे. १६ हजार ६०० कोटींचा टप्पा मुंबई जिल्हा बँकेने पार केला आहे आणि राज्यात अग्रणी बँक म्हणून नावलौकिकाला आली आहे. केवळ इतर बँकांप्रमाणे कॉर्पोरेटचा व्यवसाय न करता, नफ्यासाठी काम न करता, सामाजिक बांधिलकी म्हणून जे दायित्व सहकारात आम्हाला आहे ते दायित्व निभावण्याचे कामही जिल्हा मध्यवर्ती बँकेने केल्याचे दरेकरांनी म्हटले. तसेच यावेळी दरेकर यांनी गिरणी कामगार, माथाडी कामगार, पोलीस कर्मचाऱ्यांना घरांसाठी आणि लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी मुंबई बँकेमार्फत आर्थिक सहकार्य केल्याचेही सांगितले.
दरेकर पुढे म्हणाले की, स्वयं पुनर्विकास ही आमची सर्वात महत्वकांक्षी योजना आहे. आज सोळाशे प्रस्ताव मुंबई बँकेकडे आले आहेत. ४६ संस्थांना स्वयं पुनर्विकासासाठी कर्ज दिले आहे. त्यापैकी २१ इमारती उभ्या राहिल्या आहेत. मुंबईतील मराठी माणूस नालासोपारा, वसई, विरार, कसाऱ्याला जातोय. जर स्वयंपूर्ण विकास योजना मोठ्या प्रमाणावर झाली तर मराठी माणसाला मुंबई बाहेर जावे लागणार नाही. ती संवेदना घेऊन येणाऱ्या काळात या योजनेला गती देण्याचे काम आमचे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईच्या जीवनमानात चांगले योगदान मुंबई बँक देईल
सहकार हा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सहकारी व्यवस्था मजबूत झाली पाहिजे, सहकारी संस्था सक्षम राहिल्या पाहिजेत, ज्या खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना दिशा आणि ताकद देण्याचे काम करत असतात. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलेय सहकारातील व्यवहार सहकारात केला पाहिजे. आपल्या मुंबई बँकेला आपण सहकार्य करून ताकद द्या निश्चितपणे मुंबईच्या जीवनमानात एक चांगले योगदान मुंबई बँक दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.