मिरा-भाईंदरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणीला गती सामाजिक न्याय विभागाकडून १.४६ कोटींची तरतूद — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे घोडबंदर, सर्वे क्र. २३३ येथील जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६ फुटी पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीस गती मिळाली असून, यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मिरा-भाईंदर महापालिकेला १ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुढील सहा महिन्यांत पुतळा उभारणीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्रालयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या दालनात आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे तसेच मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा शहर अभियंता दीपक खांबित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, संबंधित सर्वे क्रमांकातील सुमारे ३८०० चौ.मी. जागा यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासह बहुउद्देशीय इमारत उभारण्यासाठी सुरुवातीला सुमारे १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात या स्मारकासाठी २० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही मंजूर करण्यात आला.
या निधीतून लंडनमधील स्मारकाच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील पहिले भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मिरा-भाईंदर शहरात साकारले जात आहे.
दरम्यान, आंबेडकर प्रेमी जनतेच्या मागणीचा विचार करून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी १६ फुटी पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा पुढाकार घेतल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. पुतळा उभारणीसाठी सुमारे २०० चौ.मी. जागेची आवश्यकता असून ती सामाजिक न्याय विभागामार्फत महापालिकेला हस्तांतरित करण्यात येत आहे. तसेच शासनाच्या २ मे २०१७ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेमुळे मिरा-भाईंदर परिसरात लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारणीस गती मिळणार असल्याचा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *