टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका सीआयडी (CID) सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा नवीन सीझन नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी साटम आणि आदित्य श्रीवास्तव यांचा लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
CID आठ वर्षांनी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
इन्स्टाग्रामवर सीआडीच्या निर्मात्यांनी या नवीन सीझनचा एक टीझर प्रदर्शित केला आहे, ज्यामध्ये दयानंद शेट्टीचे डोळे दाखवण्यात आले असून त्याच्या कपाळातून रक्त येत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर शिवाजी साटम म्हणजेच मालिकेत एसीपी प्रद्युमन हे मुसळधार पावसात कारमधून छत्री उघडून बाहेर येतात. त्यानंतरच्या दृश्यात आदित्य श्रीवास्तवचे डोळे दाखवले आहेत, त्याचवेळी टाइम बॉम्बचा आवाज ऐकायला मिळतो. या टीझरच्या शेवटी २६ ऑक्टोबरला एक धमाकेदार प्रोमो प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत या मालिकेप्रति प्रेम व्यक्त केले आहे. अनेकांनी बालपण परत आले असे म्हटले आहे.
‘सोनी टीव्ही’वर प्रदर्शित होणाऱ्या या शोने २७ ऑक्टोबर २०१८ ला प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. २० वर्षे यशस्वीपणे हा शो चालला. प्रेक्षकांचे भरपूर प्रेम सीआयडीला मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. सर्वात जास्त काळ प्रदर्शित होणाऱ्या शोपैकी सीआडी हा एक शो आहे. २१ जानेवारी १९९८ ला प्रीमिअर होणारा हा शो टेलिव्हिजन शोमधील एक महत्त्वाचा भाग बनला, ज्यामध्ये एसीपी प्रद्युमन आणि इन्स्पेक्टर दया या पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ही मालिका इतकी गाजली होती आणि लोकांना आवडली होती की, प्रेक्षक हा शो संपल्यानंतरही त्याचे जुने भाग आवडीने बघत असत.दरम्यान, सीआडीमधील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. काही पात्रे प्रेक्षकांची विशेष लाडकी झाली. एसीपी प्रद्युमन, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत, सीनियर इन्स्पेक्टर दया, पंकज, श्रेया, पूर्वी, डॉक्टर साळुंखे, डॉक्टर तारिका ही पात्रे प्रेक्षकांना आजही लक्षात आहेत.
दिवंगत अभिनेते दिनेश फडणीस यांनी इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची साकारलेली भूमिका ही महत्त्वाची आणि विनोदी भूमिका होती, त्यांनी ती उत्तम साकारली होती. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यानंतर कलाकारांसह प्रेक्षकांनीदेखील हळहळ व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. सध्या तरी टीझरमध्ये एसीपी प्रद्युमन, सीनियर इन्स्पेक्टर अभिजीत, सीनियर इन्स्पेक्टर दया या तिघांचे चेहरे दिसत आहेत. मात्र, सीआयडीमधील इतर कोणते जुने कलाकार नवीन सीझनमध्ये दिसणार ते प्रोमो रिलीज झाल्यावरच कळेल. आता सीझनमधील कोणते कलाकार पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.