मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम यंदा अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून विविध विभागांच्या समन्वयातून अनुयायांसाठी सर्वंकष सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही केवळ औपचारिकता नसून त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी केली जावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून त्यातील समावेशकतेमुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगतीमागील बाबासाहेबांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. उष्णतेपासून संरक्षणासाठी मंडप उभारणे, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करणे, तसेच दादर परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना मार्गदर्शनासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावण्याचे तसेच दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान बेस्टमार्फत अतिरिक्त बससेवा सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशासह जगभर मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याने हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनावर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तयार करण्यात आलेल्या पोस्टरचेही विमोचन करण्यात आले.