मुंबई : इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे ‘ईकॅमेक्स-२६’ या तीन दिवसीय भव्य औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ४ एप्रिल रोजी गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
विद्युत, ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे आणि नव्या संधींचा आढावा या प्रदर्शनातून घेता येणार आहे. इलेक्ट्रिकल उद्योगातील सर्व क्षेत्रांचा समावेश असलेल्या या प्रदर्शनात देशभरातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. उद्योगातील तज्ञ, कंत्राटदार, अभियंते तसेच विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.
शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता हॉल क्रमांक २, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात ऊर्जा बचत, सौर ऊर्जा, स्मार्ट इलेक्ट्रिकल सोल्यूशन्स, सुरक्षा तंत्रज्ञान आणि नवीन औद्योगिक उपकरणांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाचे आयोजन इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष देवांग ठाकूर, सरचिटणीस अमरनाथ पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, खजिनदार अमोल कोलपकर, संयुक्त सचिव सचिन फर्टाडे तसेच ईकॅमेक्स-२६ चे अध्यक्ष अमेय कन्नाव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
प्रदर्शनास उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, कंत्राटदार, अभियंते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.