मिरा-भाईंदर : प्रतिनिधी
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२६ अखेरपर्यंत २८६ कोटी ४८ लाख रुपयांची उल्लेखनीय कर वसुली करण्यात आली आहे. या कर वसुलीसाठी नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल महानगरपालिकेने सर्व करदात्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी यंदा विविध प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या. थकबाकीदारांवर जप्ती व जाहीर लिलावाची कारवाई, तसेच व्यापक जनजागृती मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणावर कर भरणा झाला. या उपाययोजनांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने कर वसुलीत वाढ झाली.
महानगरपालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त (कर), उपायुक्त (कर), सहाय्यक आयुक्त (कर), कर निरीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून ही कामगिरी साध्य केली. तसेच महापौरांनी दिलेले निर्देश, धोरणात्मक पाठबळ आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे कर वसुली मोहिमेला अधिक गती मिळाली.
मागील वर्षी ३१ मार्च २०२५ पर्यंत २३०.१७ कोटी रुपयांची कर वसुली करण्यात आली होती. यंदा त्यामध्ये लक्षणीय वाढ होत २८६.४८ कोटींची वसुली करण्यात आली असून मालमत्ता कर वसुलीत सुमारे २८ कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.
महानगरपालिकेच्या www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर तसेच MYMBMC मोबाईल अॅपद्वारे कर भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ऑनलाइन पद्धतीने ९ लाख ६७ हजार नागरिकांनी १३६ कोटी ७४ लाख रुपयांचा कर भरला, तर रोख व धनादेशाद्वारे १ लाख ४६ हजार नागरिकांनी १२३ कोटी १० लाख रुपयांचा कर भरून महानगरपालिकेस सहकार्य केले.
शहरातील सर्व नागरिकांनी मालमत्ता कर भरून दिलेल्या सहकार्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाने तसेच आयुक्त डॉ. राधाबिनोद अ. शर्मा यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.