सीमेवरील शांततेला प्राधान्य असावे’; जिनपिंग यांना पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

Spread the love

कझान (रशिया) : सीमेवरील शांतता आणि स्थैर्याला दोन्ही देशांचे प्राधान्य असावे आणि विश्वास हा द्विपक्षीय संबंधांचा आधार असावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना केले. येथे सुरू असलेल्या ‘ब्रिक्स परिषदे’च्या पार्श्वभूमीवर तब्बल पाच वर्षांनी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. अलीकडेच पूर्व लडाखच्या सीमेवरील गस्तीबाबत झालेल्या करारावरही दोन्ही नेत्यांनी शिक्कामोर्तब केले. सुमारे ५० मिनिटे चाललेल्या या बैठकीबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम विस्राी म्हणाले, की सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची असल्याची दखल उभय नेत्यांनी घेतली. प्रतिनिधींची पुढील बैठक नियोजित वेळी होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. परिपक्वता आणि शहाणपणा बाळगून परस्परांचा आदर करत सीमेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे गरजेचे असल्याचे मतही मोदी आणि जिनपिंग यांनी मांडल्याचे मिस्राी म्हणाले. आता दोन्ही देशांचे अधिकारी ही चर्चा पुढे नेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. जगातील सर्वांत मोठी दोन राष्ट्रे या नात्याने भारत आणि चीनमधील सौदार्हपूर्ण संबंध हे प्रादेशिक आणि जागतिक शांततेवर सकारात्मक परिणाम करतील, यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाच वर्षांनंतर द्विपक्षीय चर्चा

लडाख सीमेवरील तणावामुळे मोदी आणि जिनपिंग यांच्यात तब्बल पाच वर्षांनी नियोजनबद्ध चर्चा झाली. यापूर्वी ऑक्टोबर २०१९मध्ये ममलापूरम येथे दोघांमध्ये संवाद झाला होता. नोव्हेंबर २०२२मध्ये जी-२० परिषदेनिमित्त इंडोनेशियात आणि गतवर्षी ऑगस्टमध्ये जोहान्सबर्ग (द.आफ्रिका) येथील ब्रिक्स बैठकीवेळी दोघांची ओझरती भेट झाली होती. मात्र दोन देशांतील संबंध ताणले गेल्यामुळे दोन्ही वेळा द्विपक्षीय चर्चा झाली नव्हती.

भारत-चीन संबंध केवळ आमच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर जागतिक शांतता, स्थैर्य आणि प्रगतीसाठी महत्त्वाचे आहेत. परस्परांवर विश्वास, आदर आणि संवेदनशीलता हा संबंधांचा पाया असायला हवा. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *