घाटकोपर (प्रतिनिधी) – शहरातील घाटकोपर परिसरात आज दिवसभरात आगीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे दोन्ही ठिकाणी आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला. विद्याविहार पश्चिम येथील स्कायलाइन एपिटोम इमारतीतील इलेक्ट्रिक मीटर कॅबिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीत परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेदरम्यान स्थानिक नगरसेवक धर्मेश गिरी यांनी तातडीने पालिका व अग्निशमन दलाशी संपर्क साधून घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बचावकार्य अधिक जलद गतीने पार पडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, घाटकोपर पूर्व येथील गरोडिया नगर परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुमारे 8 रिक्षांना आग लागल्याची आणखी एक घटना घडली. या आगीत रिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.