क्रांतीवीरांना अभिवादन; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते संकेतस्थळाचे अनावरण

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, शहीद भगतसिंग आणि शहीद सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त २३ मार्च रोजी पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघाच्या वतीने मंत्रालय येथील हुतात्मा राजगुरू चौकात विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. मुंबई जिल्हाधिकारी अंचल गोयल, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, पिंपरी-चिंचवडचे आमदार शंकरराव जगताप तसेच ठाण्याचे आमदार निरंजन डावखरे हे यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी यावेळी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत डिजिटल माध्यमातून संस्थेचे कार्य अधिक व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच क्रांतीवीरांच्या स्मृती जपून समाजकार्याची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब ठाकूर आणि संचालक भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, नव्याने सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळामुळे पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघाच्या विविध योजना, उपक्रम आणि कार्याची माहिती सभासदांना व नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *