मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या अत्याधुनिक बस सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवन परिसरात मोठ्या दिमाखात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर पार पडलेल्या या सोहळ्याने एसटीला नवे बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
राजमाता जिजाऊंच्या नावाने सुरू करण्यात आलेली ही सेवा केवळ बस सेवा नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा संदेश देणारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या बसमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी मिळणार असल्याचा दावा करण्यात आला.
राज्यात टप्प्याटप्प्याने सुमारे ३ हजार बस रस्त्यावर आणण्याचे नियोजन असून, एसटीच्या ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘हिरकणी’सारख्या सेवांमध्ये आता ‘राजमाता जिजाऊ’ची भर पडली आहे.
दरम्यान, एसटीची आर्थिक अवस्था डळमळीत असताना नव्या योजनांची घोषणा होत असली तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील सेवा कितपत सुधारते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. घोषणांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.