200 रुपयांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला

घाटकोपर मध्ये मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

घाटकोपर पश्चिम येथील चिराग नगर परिसरात केवळ 200 रुपयांच्या उधारीच्या वादातून एका तरुणावर बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिराग नगर येथे राहणारे सुनील हेमंत पटवा (23) आणि अजमल अन्सारी (27) हे एकाच परिसरात राहतात. सुनील पटवा याने अजमलकडून 200 रुपये उधार घेतले होते. हे पैसे परत मागितल्यावर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हिंसाचारात झाले.

संतापलेल्या अजमल अन्सारी याने पाईपने सुनीलवर बेदम हल्ला केला. सुनील बेशुद्ध पडेपर्यंत त्याच्यावर मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत सुनील जमिनीवर कोसळला. स्थानिकांनी त्याला तातडीने कुर्ला येथील नूर रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजमल अन्सारी याला अटक केली आहे. ही घटना 16 तारखेला रात्री घडली असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या मारहाणीचे चित्रीकरण काही स्थानिकांनी मोबाईलमध्ये केले असून ते सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या घटनेवर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारच्या वाढत्या नशेखोरी आणि दादागिरीमुळे परिसरात असुरक्षितता निर्माण होत असल्याचे सांगत, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची तसेच पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *