मीरा-भाईंदर : प्रभाग ७ मधील क्रॉस गार्डन परिसरात सुरू असलेल्या महानगर गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामांची शनिवारी (१४ मार्च) उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी मिरा भाईंदर महानगरपालिका अधिकारी, संबंधित विभागाचे प्रतिनिधी आणि स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या वेळी सुरू असलेल्या कामाचा दर्जा, सुरक्षिततेच्या उपाययोजना तसेच कामामुळे परिसरातील नागरिकांना कमीत कमी अडचण होईल यासाठी कोणती काळजी घेतली जात आहे, याबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. काम वेळेत आणि नियमानुसार पूर्ण करण्याबाबतही संबंधितांना सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, प्रभागातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करून नागरिकांना सुरक्षित आणि सुकर सेवा उपलब्ध करून देणे हे प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधींचे सामूहिक कर्तव्य असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
स्थानिक रहिवाशांनीही काम करताना रस्ते, वाहतूक आणि सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.