२५ ऐवजी २३ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ
मिरा भाईंदर महापालिका प्रभाग क्र. ४ मध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
मिरा भाईंदर | प्रतिनिधी – देशभरात दरवर्षी २५ जानेवारी रोजी साजरा होणारा राष्ट्रीय मतदार दिन यंदा सार्वजनिक सुट्टीमुळे शुक्रवार, २३ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्व शासकीय कार्यालये व सार्वजनिक उपक्रमांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मतदार दिनाची शपथ देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता किंवा कार्यालयीन सोयीप्रमाणे शपथविधी पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या संदर्भातील आदेश उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी जारी केले असून, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, मिरा भाईंदर महापालिका प्रभाग क्र. ४ येथे सहाय्यक आयुक्त स्वप्नील सावंत यांच्या उपस्थितीत मिरारोड येथील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेतली.
यावेळी बोलताना स्वप्नील सावंत यांनी सांगितले की, मतदार नोंदणी कार्यक्रम संपूर्ण वर्षभर सुरू असतो. १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुणाने मतदार नोंदणी करून संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही अधिक बळकट करावी, असे आवाहन त्यांनी केले.