निवडणुका येतील-जातील, पण श्वास मराठीच! पुन्हा उभं राहा, नव्याने लढा – राज ठाकरे

मुंबई : अचाट धनशक्ती, सत्तेची मस्ती आणि व्यवस्थेचा दडपशाहीचा विळखा असतानाही शिवशक्तीने दिलेली झुंज अभिमानास्पद आहे, असे ठणकावून सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे व शिवसेनेच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे.
“ही निवडणूक सोपी नव्हती. सत्तेच्या ताकदीसमोर मराठी माणसाची ताकद उभी होती. तरीही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी झुंज दिली. हेच आमचे खरे यश आहे,” असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मनसेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी खचून जाण्याचा प्रश्नच नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
निवडून आलेले मनसे नगरसेवक स्थानिक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या हक्कावर गदा आली, तर त्यांना जेरीस आणल्याशिवाय राहणार नाहीत, असा निर्धार राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
“आपली लढाई ही मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेची आणि समृद्ध महाराष्ट्राची आहे. ही लढाई म्हणजेच आपले अस्तित्व आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना दीर्घकालीन संघर्षासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
निवडणुकीत काय चुकले, काय कमी पडले याचे आत्मपरीक्षण पक्ष आणि संघटना मिळून करतील, मात्र सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सोडणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभे राहणे हीच काळाची गरज आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
लवकरच पुन्हा भेटून नव्या जोमाने पक्ष आणि संघटना उभारू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *