बोटावरील शाई पुसून गैरकृत्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई; राज्य निवडणूक आयोगाचा इशारा

 

मुंबई : मतदानानंतर बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे हे गंभीर गैरकृत्य असून, अशा प्रकारांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. बोटावरील शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदानासाठी आल्याचे आढळल्यास संबंधितावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सांगितले की, बोटावरील शाई पुसली तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येणार नाही, यासाठी आधीपासूनच आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराने मतदान केल्यानंतर त्याची अधिकृत नोंद ठेवण्यात येते. त्यामुळे केवळ शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही.

दरम्यान, मतदान प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित राहावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असेही आयोगाने नमूद केले.

मतदारांच्या बोटाला शाई लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मार्कर पेनबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश निर्गमित केले होते. त्या आदेशांनुसारच तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटावर शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर करण्यात येत आहे, असे आयोगाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *