मिरा-भाईंदरमध्ये उद्या मतदान; प्रशासनाची अंतिम तयारी पूर्ण
मीरा-भाईंदर :मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज बुधवार, दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक प्रशासनाकडून सर्व तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले.

मतपेट्या, ईव्हीएम तसेच इतर आवश्यक निवडणूक साहित्याचे वितरण संबंधित केंद्रांवरून नियुक्त कर्मचाऱ्यांना करण्यात आले. मतदान प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे आणि नियमांचे पालन करत पार पडावी, यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता उद्या आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.