भाईंदर (प्रतिनिधी) :मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार ठरत असून, कोणतीही युती किंवा आघाडी न करता सर्वच प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने जिल्हाध्यक्ष इक्बाल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १५ उमेदवार मैदानात उतरवले असून, त्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांचे गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदाच्या निवडणुकीत बहुतांश पक्षांना बंडखोरीचा फटका बसल्याचे चित्र आहे. भाजपने २४ माजी नगरसेवकांची तिकिटे कापल्याने पक्षात नाराजी पसरली असून, मनधरणीचे प्रयत्न करूनही ८ बंडखोर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काही प्रभागांमध्ये हे बंडखोर अधिकृत भाजप उमेदवारांना थेट आव्हान देत असल्याने पक्षाच्या जागांवर धोका निर्माण झाला आहे.
शिवसेनेतील फुटीमुळे पक्षाची ताकद विखुरली गेली असून, राष्ट्रवादी काँग्रेसलाही अंतर्गत मतभेदांचा फटका बसल्याचे दिसते. काँग्रेसने बहुजन विकास आघाडीच्या सोबत मोजक्याच जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नयानगर प्रभागात एमआयएमकडून काँग्रेसच्या पारंपरिक मुस्लिम मतांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
या सर्व परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचा ‘फॅक्टर’ महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. वंचितचे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत असून, पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडी इतक्या मोठ्या प्रमाणावर मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक लढवत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इक्बाल महाडिक हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याचे सांगितले जाते. नवख्या पक्षाचे उमेदवार असले तरी सामाजिक कामाची पार्श्वभूमी आणि स्थानिक प्रश्नांवरील भूमिका यामुळे त्यांना मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
एकूणच, सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, वंचित बहुजन आघाडीची कामगिरी कोणत्या पक्षाचे गणित बिघडवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.