भाईंदर (प्रमोद देठे) :मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ दरम्यान आचारसंहिता आणि लोकशाही मूल्यांचा बळी घेतला जात असल्याचा गंभीर आरोप मनसे उमेदवार सचिन वसंत पोपळे यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक १८ ड मधून निवडणूक लढवत असलेल्या पोपळे यांनी सत्ताधारी मंत्री व आमदार शहरात खुलेआम आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे.
हळदी-कुंकूच्या कार्यक्रमांच्या नावाखाली वस्तू वाटप, जेवणाचे आयोजन आणि भंडाऱ्यांचे कार्यक्रम सुरू असून, दररोज १० ते १५ सोसायट्यांमध्ये जेवणाचे वाटप केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत निवडणूक प्रशासन आणि आचारसंहिता पथकाकडे तक्रारी करूनही कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे प्रशासन आणि आचारसंहिता पथक सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असून, “सत्तेच्या ताटाखालचे मांजर” झाले असल्याची टीका सचिन पोपळे यांनी केली. आचारसंहिता भंगाच्या स्पष्ट तक्रारी असूनही कारवाई होत नसल्याने लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत, तर सोमवारी दुपारी १२ वाजता बौद्ध विहार, आरओ ऑफिस क्रमांक ५ येथे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे उमेदवार सचिन पोपळे यांनी दिला आहे.
महानगरपालिका निवडणूक पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त करत निवडणूक आयोग व प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.