मुंबई (प्रमोद देठे) : “बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांना येथील जनता मतदानाच्या पेटीतूनच धडा शिकवेल,” असा इशारा देत शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांनी प्रभाग क्रमांक २२३ मधील शिवसेनेच्या उमेदवार सौ. प्रिया रूपेश पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
“विरोधक आठ वर्षे कुठे होते? जनतेच्या समस्या सोडवताना ते कधीच दिसले नाहीत. आज निवडणूक आली की खोटे आरोप सुरू झाले आहेत. मात्र येथील जनता सजग असून, धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रिया पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करणार,” असा ठाम दावा मीनाताई कांबळी यांनी केला.
शिवसेना विभागप्रमुख रूपेश पाटील आणि उमेदवार प्रिया रूपेश पाटील हे गेली अनेक वर्षे निस्वार्थपणे जनतेची सेवा करत असून नागरी समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करत आहेत, असे सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली. “काम करणाऱ्यांवर आरोप होतात, पण जनता कोण खरे काम करते हे ओळखते,” असा टोला त्यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांच्या जोरावरच शिवसेना मतदारांकडे जात असल्याचे सांगत, येणाऱ्या मुंबई महापालिकेत शिवसेना–भाजप–आरपीआय–रिपब्लिकन सेना महायुतीची सत्ता येणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीची सत्ता आल्यावर उमरखाडी आणि डोंगरी विभागातील रखडलेले प्रश्न मार्गी लागतील आणि विकासाला गती मिळेल, असे सांगत मीनाताई कांबळी यांनी प्रिया रूपेश पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
“१६ तारखेला गुलाल आम्हीच उधळणार!” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी प्रचाराचा समारोप केला.