मुंबई – भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीचे प्रभाग क्रमांक ०३ चे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या प्रचारार्थ आज दहिसर (पूर्व) येथील वैशाली नगर येथे भाजपा खासदार मनोज तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभा पार पडली. यावेळी खा. तिवारी यांनी
उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडचे आम्ही लोकं आहोत जे महाराष्ट्रात जाऊन मराठी संस्कृती स्वीकारतो. मराठी संस्कृतीचा आम्हाला गर्व असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी प्रभाग क्रमांक ०३ चे उमेदवार प्रकाश दरेकर, भाजपा माजी खासदार गोपाळ शेट्टी, शिवसेना माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार मनोज तिवारी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मुंबई महापालिकेत भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुती सत्ता स्थापन करताना दिसतेय. प्रकाश दरेकरही जिंकताना दिसताहेत. तुम्ही तुमच्या अधिकारासाठी मतदान करा. तुमच्या मुलाचे भविष्य जपणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत. आपण उत्तर भारतीय येथे राहिलो तर आपण उत्तर भारतीय मराठी माणूस आहोत. उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडचे आम्ही लोकं आहोत जे महाराष्ट्रात जाऊन मराठी संस्कृती स्वीकारतो. मराठी संस्कृतीचा आम्हाला गर्व असल्याचेही खासदार तिवारी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, विरोधी पक्षातील उमेदवार काँग्रेस पक्षातून निवडणूक लढताहेत. जो पक्ष सर्जिल इमामसारख्या अतिरेक्याला वाचवू पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदीं विरोधात घोषणा देताहेत. आम्ही तुमच्याकडे मतं मागतो म्हणजे तुमच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी आमचीही असणार आहे. गरिबांचे दुःख भाजपच दूर करू शकते. प्रकाश दरेकर यांना सेवक म्हणून मुंबई पालिकेत पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले.
तत्पूर्वी आ. दरेकर म्हणाले की, बाळकृष्ण ब्रीद यांच्यानंतर प्रकाश दरेकर यांना महायुतीने उमेदवारी दिली. आपल्या कामाचा गंध नेहमी पसरत असतो. जेव्हा प्रकाश दरेकर यांच्या नावाची घोषणा झाली त्यानंतर पाठिंब्यासाठी शेकडो फोन आले. हिच आमची पूंजी आहे. प्रकाश दरेकर यांना तुमची सेवा करण्यासाठीच येथे पाठवले आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये त्यांनी काम केले. सेवेचे पवित्र काम आम्ही करत राहणार. जगातील कोणतीही ताकद आली तरी केतकीपाडा, धारखडी येथील लोकांना बाहेर जाऊ देणार नाही. त्यांचे येथेच पुनर्वसन केले जाईल. १५ जानेवारीला मतदान झाल्यावर आणि १६ जानेवारीला प्रकाश दरेकर निवडून आल्यावर प्राधान्याने येथील लोकांचे येथेच पुनर्वसन करणे हे माझे काम असणार आहे. स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हाडा येथे कार्यालय आहे. मुंबईत गरिबांना घर देण्याचे काम करतो तर तेथे पहिला विचार धारखाडी, केतकीपाड्याचा होईल,असा शब्दही दरेकरांनी दिला.
दरेकर पुढे म्हणाले की, केतकीपाड्यात मेहनत करणारी लोकं राहतात. जेव्हा लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये मिळाले. त्यातून त्यांना मदत होत होती. मात्र त्याने त्यांचे भविष्य बदलणार नव्हते. मी मुंबई बँकेमार्फत लाडक्या बहिणींसाठी शून्य टक्के व्याज दराची एक लाखाची कर्ज योजना आणली. आतापर्यंत पाचशे महिलांना व्यवसायासाठी शून्य टक्के व्याज दराने एक लाख रुपये दिले आहेत. केतकी पाड्यातील महिलांनाही छोट्या मोठ्या व्यवसायासाठी मदत करणार. महिलांना आर्थिक सक्षम बनविणार. आमच्या वचननाम्यात अनेक वचने तुमच्यासमोर ठेवलीत. येथे कौशल्य विकास केंद्र, मुलांसाठी चांगल्या दर्जाच्या शाळा उभारणार असून पहिल्या दोन वर्षात गरीब विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी/यूपीएससी सेंटर उभारणार असल्याचेही आश्वासन देत ज्यावेळी प्रभाग क्रमांक ३ चा निकाल येईल त्या विजयात उत्तर भारतीयांचे मोठे योगदान असेल असेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, मुंबई शहर बदलतेय. हे शहर जगातील सुंदर देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या दर्जाचे शहर बनविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवाभाऊंचा आहे. राज्यात सरकार आपले आहे. केंद्र सरकारही मदत करतेय. मात्र त्याची अंमलबजावणी करण्याची व्यवस्था महापालिका आहे. महापालिका आपल्या ताब्यात असेल, महापालिकेवर आपला भगवा फडकेल तर मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम ताकदीने भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुती करेल, असा विश्वासही दरेकरांनी उपस्थितांना दिला.

ज्यांचा पक्षच संपला ते आपल्यासाठी काय काम करणार
दरेकर पुढे म्हणाले की, तुमचे सर्व प्रश्न आम्हाला माहित आहेत. ते सोडविण्याची जबाबदारी माझी आहे. विरोधकांना निवडून दिलात तरी ते काही काम करू शकणार नाहीत. काँग्रेस पक्षाची हालत सर्वांना माहित आहे. विधानसभा, नगरपालिका आज नगरपरिषद निवडणुकीत काय झाले ते सर्वांनी पाहिले. ज्यांचा पक्ष आणि विचार संपलेत ते आपल्यासाठी काय काम करणार, अशी टीका दरेकरांनी काँग्रेसवर केली. तसेच यावेळी दरेकरांनी उबाठा गटावरही निशाणा साधला. ते म्हणाले, उबाठा काँग्रेस विचारधारेवर चालतोय. बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वचे विचार सोडले तेव्हापासून शिवसेनेची पडझड सुरु झाली. त्यामुळेच एकनाथ शिंदे बाळासाहेबांची शिवसेना घेऊन गेल्याचे दरेकर म्हणाले.