बचत गटांतील महिलांसाठी उभारणार “उमेद माॅल”, २०२६ मध्येच होणार भूमिपूजन, मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा !

बचत गटांतील महिलांसाठी उभारणार “उमेद माॅल”, २०२६ मध्येच होणार भूमिपूजन, मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा !
८१ अधिकृत उमेदवारांच्या साक्षीने ‘भगवा’ फडकवण्याचा निर्धार

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेनेने आज आपले शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा अधिकृत ‘श्रीफळ’ फोडला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मा. ना. श्री. प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा रोड येथील ‘शिवार गार्डन’ येथे आयोजित भव्य महिला मेळाव्याने शहरात राजकीय परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे सिद्ध केले. या मेळाव्यात उपस्थित ८१ अधिकृत उमेदवार आणि हजारो ‘रणरागिणीं’नी मिरा-भाईंदरवर भगवा फडकवण्याची शपथ घेतली. या मेळाव्यात हजारो महिलांनी आणि बचत गटांच्या रणरागिणींनी लावलेली उपस्थिती म्हणजे शहरात होणाऱ्या सत्तांतराची नांदी मानली जात आहे. केंद्रात आणि राज्यात ज्याप्रमाणे ‘लाडक्या बहिणीं’च्या आशीर्वादाने महायुतीचे आणि शिवसेनेचे सरकार आले, त्याच धर्तीवर आता मिरा-भाईंदर महानगरपालिकेवरही शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा संकल्प यावेळी उपस्थित महिला भगिनी तसेच सर्व शिवसैनिकांकडून करण्यात आला. गेल्या १० वर्षांपासून सत्तेच्या मोहात अंध झालेल्या आणि शहराची प्रगती खुंटवणाऱ्या प्रवृत्तींना गाडण्यासाठी महिला शक्ती एकवटली असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घेऊन महिला सन्मान आणि सशक्तीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आलेली लाडकी बहीण योजनेचा लाखो महिला लाभ घेत आहेत ही अभिमानाची बाब आहे. अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचा शिवसेनेचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. आत्मनिर्भर महिला समाजाच्या सर्वांगीण विकासासोबतच सुसंस्कृत समाज घडविण्यात मोलाचे योगदान देऊ शकतात. आजच्या मेळाव्यात शिवसेनेच्या रणरागिनींना आपली ताकद ओळखून आगामी निवडणुकांमध्ये झोकून काम करण्याचे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. सोबतच शिवसेनेचा भगवा घराघरात अभिमानाने फडकविण्यासाठी महिला शिवसैनिक मोलाचे योगदान देतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
*’लाडक्या बहिणीं’चा सन्मान बचत गटांतील महीलांसाठी उभारणार उमेद माॅल*
मिरा भाईंदर शहरात वेगवेगळ्या समाजातील नागरिकांसाठी समाज भवन बनविण्यात आलेले आहे. काही समाज भावनांचे उद्घाटन झाले असून काही समाज भवनांचे भूमिपूजन झालेले आहे. परंतु आता मात्र या बचत गट मेळाव्यामार्फत बचत गटातील महिलांसाठी ‘उमेद मॉल’ तयार करून देण्याची मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे आणि या ‘उमेद मॉल’चे २०२६ मध्येचं भूमिपूजन करणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
या मेळाव्यास शिवसेनेच्या स्टार प्रचारक आणि राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. तसेच शिवसेना प्रवक्त्या सुझी बेन शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना स्टार प्रचारक व राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. देखील उपस्थित महिलांशी संवाद साधताना म्हणाल्या कि, “मिरा-भाईंदरमधील महिलांची ही ऊर्जा पाहून स्पष्ट दिसतेय की, इथली जनता बदलासाठी सज्ज आहे. ज्यांनी महिलांच्या अस्मितेचा आणि अधिकारांचा विचार केला नाही, त्यांना आता ही ‘स्त्रीशक्ती’ धडा शिकवेल. विकासाचे इंजिन आणि शिवसेनेचा भगवा आता शहराचा कायापालट करेल. मिरा-भाईंदरमधील ही ‘स्त्रीशक्ती’ केवळ गर्दी नाही, तर हे परिवर्तनाचं वादळ आहे. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली ८१ उमेदवारांची ही फौज शहरात नवा इतिहास घडवेल!”
प्रमुख पाहुण्या शिवसेना प्रवक्त्या सुझी बेन शाह यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाल्या कि, “आजचा हा मेळावा केवळ निवडणुकीचा प्रचार नाही, तर महिलांच्या स्वाभिमानाचा हुंकार आहे. बचत गटांच्या महिलांना केवळ पोकळ आश्वासनं नकोत, तर त्यांना आर्थिक स्थैर्य देणारी व्यवस्था हवी आहे. प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलेला ‘बचत गटांसाठीचा उमेद मॉल’ हा केवळ शब्द नाही, तर महिलांच्या स्वावलंबनाचा मार्ग आहे. शिवसेनेचा विजय निश्चित आहे!.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *