डोंगरीत भगव्याचा एल्गार!
मुंबई: वॉर्ड २२३ मध्ये महायुतीचे शक्तीप्रदर्शन; प्रिया पाटील यांचा अर्ज ढोल-ताशांत दाखल
“किती येतील, किती जातील… डोंगरीत फक्त प्रिया पाटील!”
या घोषणा मंगळवारी डोंगरी–उमरखाडी परिसरात घुमत राहिल्या आणि वॉर्ड क्रमांक २२३ मध्ये निवडणुकीची नांदीच जणू वाजली. महायुतीच्या उमेदवार, शिवसेना महिला उपविभाग प्रमुख सौ. प्रिया रुपेश पाटील यांनी ढोल-ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

डोंगरी शनी मंदिरापासून रिचर्डसन क्रूड्स येथील निवडणूक कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण परिसर भगवामय केला. हातात झेंडे, खांद्यावर शेले आणि तोंडात घोषणांचा गजर असलेले शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. हजारोंच्या संख्येने नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहता डोंगरीत महायुतीची ताकद ठळकपणे दिसून आली.
या मिरवणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज सहभागी झाली होती. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी सौ. प्रिया पाटील यांचे दर्शन घेत जल्लोष केला. सध्या डोंगरी परिसरात “प्रिया पाटील” हेच नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना नेते खासदार मिलिंद देवरा, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्या नेतृत्वात मुंबादेवी विधानसभा क्षेत्राचे विभाग प्रमुख रुपेश पाटील आणि महिला उपविभाग प्रमुख सौ. प्रिया पाटील यांनी गेल्या अडीच-तीन वर्षांत वॉर्ड २२३ मध्ये विकासकामांचा सपाटा लावला आहे.
पाणीपुरवठ्यासाठी नवे पंप, इमारतींच्या दुरुस्त्या, मंदिरांची डागडुजी व रंगरंगोटी, शासन आपल्या दारी उपक्रम, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, वयोवृद्धांसाठी वॉकर, महिलांसाठी एकविरा आईचे मोफत दर्शन, तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा — अशा लोकाभिमुख कामांची यादीच त्यांनी उभी केली आहे.
या कामगिरीमुळे वॉर्डमधील जनतेतून सौ. प्रिया पाटील यांना स्पष्ट पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. डोंगरीत पुन्हा एकदा “प्रिया पाटील” हेच नाव चालणार, असा सूर आता उघडपणे उमटू लागला असून, वॉर्ड २२३ मध्ये लढतीची रंगत चढू लागली आहे.
