मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीत ऐतिहासिक विजय महायुती मिळविणार आहे. मागाठाणेचे भविष्य उज्वल होणार आहे. तुमच्या प्रत्येक मताची ताकद सत्ता बदलू शकते, असे प्रतिपादन उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीच्या वॉर्ड क्रमांक २५ च्या उमेदवार निशा परुळेकर यांच्या प्रचारार्थ कांदिवलीतील जानूपाडा येथे आयोजित केलेल्या नागरिक परिसंवादात केले.
यावेळी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर, वॉर्ड क्रमांक २५ च्या उमेदवार निशा परुळेकर, वॉर्ड क्रमांक २६ च्या उमेदवार प्रीतम पंडागळे, आप्पा बेलवळकर, वॉर्ड अध्यक्ष पवन तिवारी, महिला वॉर्ड अध्यक्षा सुनयना कदम, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, राहुल भंडारी, राकेश सिंग, अविनाश राय यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
भारत माता की जय, वंदेमातरमचा जयघोष करत खासदार पियुष गोयल यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले की, निवडणुकीचा पहिलाच कार्यक्रम आपण आदिवासी बंधू-भगिनींसोबत साजरा करतोय. मुंबई महापालिका निवडणुकीत ऐतिहासिक विजय महायुती मिळविणार आहे. मागाठाणेचे भविष्य उज्वल होणार आहे. ठाकूर व्हिलेज येथे लवकरच कौशल्य सुविधा रोजगार केंद्र सुरु करणार आहोत. तेथे तरुण तरुणीना त्यांच्या इच्छेनुसार निशुल्क रोजगार मिळणार आहे. स्थानिकांना सुविधा मिळण्यासाठी छोटे रुग्णालयही येथे सुरु करण्याची कल्पना आहे. नॅशनल पार्क मधील वनराणी ट्रेन येत्या ६ जानेवारीपासून सुरु केली जाणार आहे. प्रत्येकाला घर मिळावे यासाठी आमदार प्रवीण दरेकर यांनी स्वयं पुनर्विकास योजना आणली. त्या योजनेचे प्राधिकरण झाले, त्यांना अध्यक्ष करून मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आलाय. आपण सर्वांनी मिळून मागाठाणेला सुंदर बनवूया. पंतप्रधान मोदी म्हणतात फिट इंडिया बनवायचेय. त्याची सुरुवात ‘फिट मागाठाणे‘तून करायचीय. पाच वर्ष विकास कार्य करायचे आहे. केंद्रात मी, विधिमंडळात प्रकाश सुर्वे, प्रवीण दरेकर आहेत. भाजपा कोणतीही पदवी मिळविण्यासाठी उमेदवार देत नाही. पंतप्रधान मोदीं म्हणतात ही पदवी नाही तर जबाबदारी आहे. तुमच्या प्रत्येक मताची ताकद सत्ता बदलू शकते. १५ जानेवारीला मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहनही खा. गोयल यांनी केले.
तत्पूर्वी आपल्या भाषणात बोलताना आ. दरेकर म्हणाले की, गेल्या निवडणुकीत निशा परुळेकर यांना नवा चेहरा म्हणून उमेदवारी दिली होती. राजकारणाशी त्यांचा काही संबंध नव्हता. चित्रपट सृष्टीत त्या चांगल्या काम करत होत्या. त्यांना विनंती केल्यावर त्यांनी चित्रपट सृष्टीतील आपला व्यवसाय सोडला व भाजपचे कमळ हाती घेतले. केवळ थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला. लोकांनी प्रचंड असा पाठिंबा त्यांना दिला होता. सात वर्ष निशा परुळेकर प्रभाग क्रमांक २५ मध्ये दिवस रात्र काम करताहेत. त्यामुळे या विभागातील जनतेने निर्धार पक्का केलाय की, कोणत्याही परिस्थितीत प्रभाग क्रमांक २५ च्या नगरसेविका निशा परुळेकर होणारच.
*घाणेरडे राजकारण संपवायचे आहे*
दरेकर पुढे म्हणाले की, येथील घाणेरडे राजकारण संपवायचे आहे. विरोधक म्हणतात निशा परुळेकर नगरसेवक झाली तर वनविभागाचे काम होणार नाही. आमचे खासदार पियुष गोयल केंद्रात मंत्री आहेत. महाराष्ट्रात सरकार आमचे असून देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत. मी आमदार आहे आणि मुंबई महापालिकेत आमची सत्ता येणार आहे. तुम्हाला मातोश्री बाहेर दोन तास उभे राहूनही भेट मिळू शकत नाही, असा चिमटाही दरेकरांनी विरोधकांना लगावला. तसेच खासदार पियुष गोयल आमची ताकद आहेत. सत्तेच्या माध्यमातून तुमची कामे होऊ शकतात. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे. महापालिकेत भाजपा-शिवसेना आणि आरपीआय महायुतीची सत्ता येणार आहे.

विधानसभेत मी आमदार असताना दामू नगर, जानूपाडा, भीमनगर, केतकीपाडा, वैभव नगर, पांडे कंपाउंड, समता नगर येथील वन जमिनीचा विषय सातत्याने मांडला, बैठका घेतल्या. तुमच्या हा मूलभूत सुविधांचा विषयही पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली सोडवणार आहोत. तुमच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. मंत्री आशिष शेलार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात लक्ष घातलेय. आहे त्याचं ठिकाणी तुमचे पुनर्वसन केले जाईल, असेही दरेकरांनी आश्वस्त केले.