मिराभाईंदर – मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. युतीबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्याने शिवसेनेने भाजपला थेट पुढील २४ तासांचा अल्टिमेटम दिला असून, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा इशारा मंत्री व शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील विविध महापालिका निवडणुका युतीत लढण्याचा निर्णय झाला असला, तरी मिरा-भाईंदरमध्ये मात्र गेल्या अनेक दिवसांपासून युतीबाबत ठोस चर्चा झाली नव्हती. उलट दोन्ही पक्षांकडून आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने युती होणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती.
दरम्यान, बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक युतीत लढण्यासाठी शिवसेना व भाजपच्या प्रत्येकी तीन नेत्यांची समन्वय समिती जाहीर केली. त्यानंतर युती चर्चेचे दरवाजे उघडले गेले.
शुक्रवारी प्रताप सरनाईक आणि स्थानिक भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात भाजप कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली असली, तरी कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर दोन दिवस उलटूनही भाजपकडून युतीबाबत अधिकृत प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक असल्याने, पुढील २४ तासांत भाजपकडून सकारात्मक प्रतिसादाची प्रतीक्षा केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. अन्यथा अप्रत्यक्षपणे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपने युतीसाठी काही अटी ठेवल्याचा दावा सरनाईक यांनी केला. त्यात मिरा रोड येथील शिवार गार्डनच्या आरक्षित भूखंडाचा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले. या ठरावावर स्वतः आमदार नरेंद्र मेहता यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच दोन्ही पक्षांकडून एकमेकांचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक स्वीकारले गेल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
जागावाटपाबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की, “लहान भाऊ म्हणून काही प्रमाणात जागा कमी मिळाल्या तरी चालतील; मात्र विद्यमान माजी नगरसेवकांच्या संख्येपेक्षा अत्यल्प जागा स्वीकारल्या जाणार नाहीत.”
एकूणच, मिरा-भाईंदरमध्ये युती टिकणार की तुटणार, याचा फैसला पुढील २४ तासांत होण्याची शक्यता असून, राजकीय वर्तुळाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.