मीरा–भाईंदर : “शिक्षण हीच खरी ताकद” या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवत मीरा–भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुवर्णा दिलीप जंगम यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
प्रभाग क्रमांक ५/बी (सामान्य महिला) मधून त्या निवडणूक लढवत आहे.
“आजचे शिक्षण म्हणजे उद्याची शैक्षणिक क्रांती” या संकल्पनेतून, आतापर्यंत केलेल्या कामांची पोचपावती मागण्यासाठी आम्ही जनतेसमोर येत आहोत, असे जंगम यांनी सांगितले. गेल्या २० वर्षांत शहरातील शिक्षण व्यवस्था वाढत्या फी, डोनेशन, महाविद्यालयांची कमतरता तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या अभावामुळे ढासळली आहे. मजबूत सरकारी शिक्षण व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने आणि कोणत्याही निष्क्रिय राजकीय पक्षाशी संलग्न न होता त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
जीद्दी मराठा प्रतिष्ठानच्या आंदोलनांतून नागरिकांचे अनेक हक्क मिळवून देण्यात आले आहेत. शहरात बागा, मैदाने, रुग्णालये, अग्निशमन केंद्र, बाजारपेठा आणि पार्किंगच्या सुविधा मिळवण्यात आल्या.
मात्र, निवडून आलेल्या नगरसेवकांच्या उदासीनतेमुळे या सुविधा अद्यापही पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीत, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. जनतेच्या हक्कांसाठीचा हा लढा आता अधिक निर्भयपणे पुढे नेण्याचा निर्धार जंगम यांनी व्यक्त केला आहे.
नामांकन मंजूर होऊन अधिकृत निवडणूक चिन्ह जाहीर झाल्यानंतर मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चार उमेदवारांच्या पॅनेलमध्ये केवळ एकच अपक्ष उमेदवारी जाहीर झाली असून, आपला एकमेव मत योग्य कारणासाठी देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना (शिंदे गट) यांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नसले, तरी त्यांनी जे काम केले नाही, ते जीद्दी मराठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून साध्य करण्यात आल्याचा दावा प्रदिप दिलीप जंगम यांनी केला आहे.